![mahakumbh](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mahakumbh-4-696x447.jpg)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. अशातच एक चमत्कारीक घटना घडली आहे. महाकुंभात चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या समजून घरच्यांनी तेराव्याचे कार्य ठेवले. या कार्याचा विधी सुरू असताना चमत्कारिकरित्या ती मृत व्यक्ती घरी पोहोचली आणि त्यांना जीवंत पाहून कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला.
माध्यमांच्या वृत्तानुसार, काँग्रेसचे नेते अभय अवस्थी म्हणाले की, खुंटी गुरू असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे कुटुंब 28 जानेवारी रोजी अमृत स्नानासाठी प्रयागराज येथील महाकुंभात गेले होते. पण अचानक उसळलेली गर्दी आणि तिथे झालेल्या चेंगराचेंगरीत खुंटी गुरू बेपत्ता झाले. अनेक दिवस त्यांना शोधूनही त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांचाही चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असल्याचे मानून कुटुंबीयांनी त्यांचे तेरावं घालण्याची तयारी केली. त्यासाठी 13 ब्राम्हणांच्या भोजनाची तयारी केली. मात्र, त्याच दरम्यान एक व्यक्ती रिक्षातून खाली उतरून घराच्या दिशेने आली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ज्यांचा मृत्यू झाल्याचे समजत होते ते खुंटी गुरु होते. कोणालाच त्यांच्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता. सगळेच त्यांना चमत्कारीक नजरेने पाहत होते. पण ज्यावेळी ते जवळ आले त्यावेळी सर्वांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तेराव्याचा कार्यक्रम तत्काळ रद्द करण्यात आला.
अभय अवस्थी यांनी तत्काळ ही घटना शेअर करत सांगितले की खुंटी गुरु एकटे राहतात. ते जेवण आणि नाश्ता दोन्ही झिरो रोड बस स्टँडसमोरच करतात. कुटुंबात दुसरा कोणीही सदस्य नसल्याने फक्त परिसरातील लोकच त्यांना मदत करतात. त्यांच्या परतण्याने संपूर्ण परिसरात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.