13 आखाड्यांवरील स्नान संपले, परतीसाठी स्थानकांवर गर्दी

प्रयागराज येथील महापुंभ पर्वातील पहिले अमृत म्हणजेच शाही स्नान सुमारे 12 तासांनी संपले. आज मकर संक्रांतीच्या दिवशी सुमारे 12 तासांत साडेतीन कोटी भाविकांनी शाही स्नान केले. जुन्या आखाडय़ासह सर्व 13 आखाड्यांमधील संतांनी स्नान केले. या वेळी हॅलिकॉप्टरमधून भाविकांवर सतत फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. शाही स्नानानंतर भाविक प्रयागराजमधून परतू लागले असून सर्व रेल्वे स्थानके आणि बस स्टँडवर मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे.

पहाटे साडेपाच वाजता पहिल्या शाही स्नानाला सुरुवात झाली, अशी माहिती अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी दिली. शाही स्नानानंतर भाविक परतीच्या प्रवासाला लागले आहेत. प्रयागराज येथे तर पाय ठेवायलाही जागा नाही इतकी भाविकांची गर्दी उसळली असून लोकांना सभागृहात थांबवले जात आहे. येणाऱ्या ट्रेननुसार भाविकांना प्लॅटफॉर्मवर सोडण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.