महाकुंभमेळ्याला पोहोचण्याआधीच काळाचा घाला; बस-बोलेरोच्या धडकेत 10 भाविकांचा मृत्यू, 19 जखमी

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बस आणि बोलेरोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 19 जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील भाविक महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी बोलेरो कारने प्रयागराजच्या दिशेने निघाले होते. मात्र मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरील मेजा येथे कार आणि बसची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की बोलेरो कारचा पार चेंदामेंदा झाला आहे. यात बोलेरोतील 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती स्थानिकांनी आणि महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अन्य भाविकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बसमधील अनेक प्रवासी यात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच बोलेरोतील मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वरुप राणी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती यमुनानगरचे डीसीपी विवेकचंद्र यादव यांनी दिली.