फक्त अल्लाहकडं प्रार्थना कर! मामूटीसाठी सबरीमाला मंदिरात पूजा केल्यानं मोहनलाल ट्रोल

मल्याळम चित्रपटसृष्टीचा विषय निघतो तेव्हा मोहनलाल आणि मामूटी या दोन नावांची नेहमीच चर्चा होते. दोघेही चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार असून जिगरी मित्रही आहेत. सध्या दोघेही एका वादात अडकले आहेत. याला कारण ठरले आहे ते म्हणजे मोहनलाल यांनी मामूटीच्या चांगल्या आरोग्यासाठी केरळच्या सबरीमाला मंदिरामध्ये केलेली पूजा. या पूजेनंतर धर्मांधांनी मामूटी आणि मोहनलाल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही काळापासून मामूटी यांची प्रकृती बरी नाही. त्यांची तब्येत सुधारावी आणि चांगले आरोग्य लाभावे म्हणून मोहनलाल यांनी गेल्या महिन्यामध्ये केरळमधील सबरीमाला मंदिरामध्ये पूजा-अर्चा केली होती. यामुळे नवा वाद भडकला असून मोहनलाल यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

काय आहे प्रकरण?

मोहनलाल यांनी 18 मार्च रोजी सबरीमाला मंदिरामध्ये मामूटी यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पूजा केली होती. यादरम्यान त्यांनी मंदिरातील पूजेसाठी पुजाऱ्याकडे एक चिठ्ठी दिली होती. या चिठ्ठीवर मामूटी यांचे जन्मनाव मोहम्मद कुट्टी आणि जन्म नक्षत्र विशाखा असे लिहिलेले होते. आता ही चिठ्ठी व्हायरल झाली असून त्यामुळे मोहनलाल यांना ट्रोल केले जात आहे.

धर्मांधांची टीका

दरम्यान, मूर्तीपूजा इस्लामविरोधात आहे. मामूटी जन्माने मुसलमान आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हिंदू मंदिरामध्ये पूजा केल्याने मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या असून मामूटी यांनी फक्त अल्लाहकडे प्रार्थना करावी, अशी टीका धर्मांधांनी टीका केली आहे.

मोहमनलाल म्हणतात…

दरम्यान, या वादावर मोहनलाल यांनी चेन्नईतील एका कार्यक्रमात भाष्य केले. माझ्या पूजेचा उद्देश फक्त मामूटीच्या चांगल्या आरोग्यासाठी होता. त्यामागे दुसरा कोणताही दृष्टिकोन नव्हता. मामूटी माझ्यासाठी मित्र नाही, तर भावासारखा असून हा माझा पूर्णपणे वैयक्तिक विषय होता. पण दुर्दैवाने ही गोष्ट समोर आली, असे मोहनलाल म्हणाले.

एल-2 एम्पुरान 27 मार्चला होणार प्रदर्शित

दरम्यान, मोहनलाल यांचा मल्याळम अॅक्शन सिनेमा ‘एल-2 एम्पुरान’ 27 मार्चला जगभरात प्रदर्शित होणार आहे. L2 Empuraan या चित्रपटामध्ये मोहनलाल यांच्या व्यतिरिक्त पृथ्वीराज सुकुमारन, मंजू वॉरियर आणि टॉविनो थॉमिस यासारखे कलाकार दिसणार आहेत. L2 Empuraan हा 2019 मध्ये आलेल्या ल्युसिफर या चित्रपटाचा सिक्वेल आहे.