रंगभूमी – प्रवीण स्मृती रंगमहोत्सव

>> अभिराम भडकमकर

पाटण्यामधील मानाचा आणि प्रसिद्ध अशा प्रवीण स्मृती महोत्सव या चार दिवसीय नाट्य महोत्सवात विजेंद्र टाक या गुणी रंगकर्मीने दिग्दर्शित केलेली नाटकं पाहता आली. बिहारचे नाटक इथली लोककला आणि इथली माती याच्याशी पूर्णत जोडली गेलेली आहे. हे प्रतिबिंब पाहताना हा महोत्सव रंगभूमीची ताकद दाखवून देणारे उदाहरण आहे हे जाणवले.

नाटक माणसाच्या आयुष्यामध्ये कसे आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विजेंद्र टाक आणि त्याची टीम. बिहारच्या या संस्थेचा हा लीडर. सध्या पाटण्यामध्ये त्याच्या प्रवीण स्मृती महोत्सव या नावाने होणाऱया चार दिवसीय नाट्य महोत्सवाचे आयोजन केलं गेलं आहे. या नाट्य महोत्सवामध्ये विजेंद्रनेच दिग्दर्शित केलेल्या चार नाटकांचा आणि त्याच्या हाताखाली तयार झालेल्या चार दिग्दर्शकांच्या नुक्कड नाटकांचा समावेश आहे. ही चारही नाटकं पाहताना एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बिहारचे नाटक इथली लोककला आणि इथली माती याच्याशी पूर्णत जोडली गेलेली आहेत. प्रत्येक नाटकामध्ये उत्तम संगीत आणि खणखणीत गाणारी मुलं-मुली. बिहारच्या वेगवेगळय़ा डायलेक्ट्सचा खूप छान उपयोग या नाटकांमध्ये आढळून येतो. चारही नाटकांच्या कथा या बिहारच्याच लोककथा, साहित्यावर आधारित अशा.
इथे नाटक पाहताना एक गोष्ट नक्कीच जाणवली की, आपल्यासारख्या व्यावसायिक रंगभूमीचा अभाव इथे निश्चितच आहे. तिकीट काढून येणारा प्रेक्षक अजून पुरेपूर निर्माण झालेला दिसत नाही. पण तरीही वेगवेगळऱ्या अडचणींना तोंड देत इथलं नाटक आजही अत्यंत दमदार पद्धतीने सुरू आहे. थोडंसं गतकाळात रमणारं नाटक असलं आणि आजच्या आधुनिक रंगभूमीवर आढळणाऱ्या विषयांचा काहिसा अभाव दिसत असला तरी आपली लोककला आणि आपलं लोकसंगीत याच्याशी घट्टपणे बांधून घेतलेलं, त्याच्याशी नातं सांगणार आहे. असं नाटक पाहणं खूपच भारी आहे. आजही मी एक स्त्री आहे आणि माझी मुलं ही माझी आहेत, त्यावर माझा अधिकार आहे, त्यावर जन्माला येणारे मूल हे कोणाचं असायला हवं हे ठरवण्याचा माझा अधिकार आहे, हे मांडणारं ‘कुच्चीकी कहानी’सारखं नाटक अत्यंत बोल्ड मानलं जातं. रेश्मा आणि चुहर यांची प्रेमकथा ही रंजक पद्धतीने सांगणारं ‘नागरडोला’ नावाचं नाटक ज्यामध्ये दोन मजली सेट उभा केलेला दिसतो. नृत्य आणि गायनाच्या सहाय्याने ही कथा खूप छान फुलवलेली आपल्याला दिसते. बिहारच्या इतिहासातलं इंग्रजांच्या विरुद्ध उभे राहणारे नंदू सिंग हे पात्र मांडणारं नाटक ‘गुंडा’ अतिशय उत्कटतेने सादर केलं जातं. आजच्या आधुनिक जीवनशैलीच्या विषयांचा यात समावेश नसला तरीही ही गोष्ट स्पष्ट जाणवते की बिहार, बिहारची खेडी, शेतकरी वर्ग, त्यांच्या समस्या या सगळय़ांचा खूप चांगला धांडोळा या नाटकांमध्ये घेतला जाताना दिसतो. अत्यंत दमदार रंजक अशा या प्रस्तुतींनी हे चार दिवस खूप छान गेले.

‘प्रवीण स्मृती समारोह’ यामागे एक मोठी कथा आहे. स्वत विजेंद्र कुमार टाक हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहणाऱया कुटुंबातलं अपत्य. आजूबाजूला गुन्हेगारी झोपडपट्टी, शिक्षणाचा अभाव, त्यामुळे संधींचा अभाव आणि इथल्या मुलांचे भविष्य पुन्हा एकदा गरिबी, हलाखी आणि गुन्हेगारीत वाया जाणार हे नक्की. अशा परिस्थितीमध्ये विजेंद्र कुमार टाक यांना नाटक हे माध्यम गवसतं, त्यांचं आयुष्य बदलतं आणि संगीत नाटक अकादमीचा युवा पुरस्कारही मिळतो. नाटकामध्ये उभं राहणं, काम करणं याचसोबत प्रकाशयोजना आणि नेपथ्य यावर त्यांचा अभ्यास सुरू होतो आणि उत्तम प्रकाशयोजनाकार असा नावलौकिकही मिळू लागतो. पण या सगळय़ाचा फायदा एकट्याने घेऊन पुढे जाण्याऐवजी ते आपल्या आजूबाजूच्या आपल्यासारख्याच मुलांना एकत्र करतात आणि त्यांना रंगभूमीची वाट दाखवतात. प्रवीण हा त्यातलाच एक मुलगा रंगभूमीवर गाजत असतानाच त्याच्याच वस्तीतल्या काही लोकांना त्याचं हे वस्तीवेगळं होणं फारसं आवडत नाही आणि त्यातून त्याची हत्या होते. आपल्या या मित्राची, विद्यार्थ्यांची, सहकलावंताची स्मृती जपण्यासाठी म्हणून मग विजेंद्र टाक आपले अनेक मित्र आशीष मिश्रा, संजय उपाध्याय यांच्या सारख्यांसोबत प्रवीण स्मृती समारोहाचं आयोजन करू लागतात आणि पाहता पाहता हा नाटय़ महोत्सव पाटण्यामधला एक महत्त्वाचा नाटय़ महोत्सव होऊन राहतो. आजही त्यांच्या नाटकांमधल्या मुलांना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी, गुन्हेगारीच्या मानसिकतेतून बाहेर पडून काही वेगळं करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध आहे. म्हणून विजेंद्र कुमार टाक यांचा हा महोत्सव केवळ रंग महोत्सवच नव्हे तर तो एक रंगभूमीची ताकद दाखवून देणारे उदाहरण आहे. यंदाच्या महोत्सवात त्यांनी स्वर्गीय उषा किरण खान (साहित्य अकादमी प्राप्त ज्येष्ठ लेखिका) यांना अर्पण केला. यात सादर झालेली चारही नाटकं ही बिहारच्या रंगभूमीचं एक छान, नेत्रसुखद आणि अर्थपूर्ण असे स्वरूप जाणवून देणारी होती. यातला प्रत्येक मुलगा कुठलं ना कुठलं वाद्य कुशलतेनं वाजवतो आणि गायला उभा राहिला की चमत्कारच करतो.

बिहारमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही आणि लोकाश्रय खूपच कमी आहे. अशा वेळी निश्चितच अनुदानावरती अवलंबून राहावं लागत असलं तरीसुद्धा त्या सगळय़ा अडचणींना तोंड देत बिहारची रंगभूमी ही पुढे जाते आहे. कारण विजेंद्र टाकसारखी माणसं या रंगभूमीवर कार्यरत आहेत. बिहारची नाटकं पाहताना एक लक्षात येतं की, आधुनिक जीवनशैलीशी फारसा संबंधित नसल्यामुळेच लोकभाषा, लोकसंगीत या सगळय़ांना घट्ट कवटाळणारं आणि त्याचं जतन करणारं हे नाटक आहे. प्रेमचंद रंगशालेच्या बाहेरच्या नुक्कड नाटकांमध्येसुद्धा असेच गमतीदार विषय खूप छान पद्धतीने मांडले गेले होते. लहान लहान मुलांनी सादर केलेली पथनाट्ये आश्वासक होती. बिहारचे हे चार दिवस खूप काही देऊन गेले आणि पुन्हा एकदा गरज जाणवली ती रंगकर्मींच्या आपापसातल्या संवादाची. एक व्यासपीठ जे एकमेकांना जोडेल. आवश्यक आहे ते आपण अत्यंत प्रामाणिकपणे करत राहण्याची. आपण एकटे नाही ही जाणीव करून देणार हे वातावरण होतं. प्रवीण स्मृती रंग महोत्सव पाहताना हीच जाणीव अधिक ठळक झाली आणि आश्वस्त व्हायला झालं.

[email protected]
(लेखक नाट्यकर्मी असून नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)