
वासिंद येथील प्रवीण चन्ने मरणानंतरही जिवंत राहणार आहे. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने प्रवीणला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर प्रविणच्या कुटुंबीयांनी धाडसी निर्णय घेत आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मरणानंतरही प्रवीणच्या अवयव दानामुळे अनेकांना जीवदान मिळणार असून चन्ने कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीच जपली आहे.
प्रवीण चन्ने (44) हे रिलायन्स जियोमध्ये नोकरी करीत होते. त्याचा रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तस्राव झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डोंबिवली एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी चन्ने कुटुंबाला विश्वासात घेऊन प्रवीणच्या अवयव दानाबाबत आवाहन केले. प्रवीणचे वडील अशोक चन्ने व त्याचे तीन काका यांनी यावर निर्णय घेत अवयव दानाला संमती दिली. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, डी.वाय. पाटील पुणे हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, तसेच मुलुंड येथील फोर्टिज या रुग्णालयांना हे अवयव देण्यात आले. यात किडनी, फुप्फुस, डोळे, इतर अवयव नेण्यात आले. गरजूंवर तत्काळ हे अवयव प्रत्यारोपण करण्यात येणार असून त्यांना जीवदान मिळणार आहे.
समाजातून चन्ने कुटुंबाचे कौतुक
प्रवीणवर वासिंद येथे हनुमान कॉलनी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खर्डी, वासिंद येथील अनेकांनी उपस्थित राहत आदरांजली वाहिली. यावेळी चन्ने परिवाराने प्रवीणचे अवयव दान करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करण्यात आले.