जेवण देण्यास नकार दिला, दिलेले जेवण खराब असल्याच्या कारणावरून पाच गुंडांनी कोयते व तलवारीने केलेल्या हल्ल्यात निघोज (पारनेर) येथील जत्रा हॉटेलचे मालक प्रवीण भुकन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रवीण यांचा भाऊ गणेश भुकन, भाचा ओंकार रसाळ, हॉटेल कामगार अजय व सुजान हेही हल्ल्यात जखमी झाले आहेत. आरोपींनी यावेळी केलेल्या मोडतोडीत हॉटेलमधील लॅपटॉप, टीव्ही, काउंटर अशा विविध वस्तूंचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवारी (दि.2) मध्यरात्री हल्ल्याची घटना घडली. या संदर्भात हॉटेलमालक गणेश भुकन यांनी फिर्याद दिली आहे.
पारनेर पोलिसांनी याप्रकरणी आदिनाथ मच्छिंद्र पठारे, धोंडय़ा उैर्फ धोंडीभाऊ महादू जाधव, सोन्या ऊर्फ प्रथमेश विजय सोनवणे, विशाल खंडू पठारे, शंकर केरू पठारे या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी निघोज, निघोज परिसरातील पठारवाडी, सुलाखेवस्ती (निघोज कुंड) येथील रहिवासी आहेत. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले असल्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले.
आरोपींपैकी धोंडय़ा जाधव हा निरगुडसर (आंबेगाव, पुणे) येथील बँकेवर घालण्यात आलेल्या दरोडय़ातील आरोपी आहे. सध्या त्याची जामिनावर सुटका झाली आहे. दरम्यान, या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला असून, व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
निघोज येथे गेल्या काही वर्षांपासून दारूबंदी आहे. मात्र, अनेक हॉटेल, धाब्यांवर दारूविक्री केली जाते. हॉटेलमालक अवैध व्यवसाय करीत असल्याने परिसरातील गुंड हॉटेल मालकांना धमकावून बिल न देता मद्यपान व जेवण करतात. त्यामुळे असे वाद नेहमीच होतात.