प्रतिती, सात्त्विकचा बुद्धिपराक्रम

बुटमी येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘फिडे युथ विश्वचषक स्पर्धेत’ 12 वर्षांखालील मुलींच्या गटात हिंदुस्थानच्या प्रतिती बोरदोलोई हिने द्वितीय क्रमांकासह रौप्य पदकाला, तर 8 वर्षांखालील गटात सात्त्विक स्वेनने कास्य पदकाला गवसणी घातली आहे. बटुमी येथे 8, 10 आणि 12 वर्षांखालील गटात ‘फिडे युथ विश्वचषक स्पर्धा’ नुकतीच पार पडली. या स्पर्धेत 37 देशांतील 288 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत हिंदुस्थानच्या बुद्धिबळपटूंनी विशेष कामगिरी करून दाखवली. उत्कृष्ट कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली आहे. 12 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रतिती बोरदोलोई हिने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदकाची कमाई केली.

या गटामध्ये चीनच्या झू तियानहाओ हिने सुवर्ण, तर श्रीलंकेच्या ओशिनी गुणवर्देनाने तिसरे स्थानासह कास्य पदकाची कमाई केली. तर सात्त्विक स्वेन याने 8 वर्षांखालील गटात कास्य पदकाची कमाई केली आहे. या गटामध्ये कझाकिस्तानच्या रिजात इलानने सुवर्ण पदक, तर अमेरिकेच्या एडन लीने रौप्यपदक पटकावले आहे.