महाराष्ट्राच्या मातीत वाढलेल्या खो-खोच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकावर हिंदुस्थानचे नाव कोरण्यासाठी राष्ट्रीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंची ताकद देण्यात आली आहे. येत्या 13 ते 19 जानेवारीदरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खो-खोचा विश्वचषक खेळला जाणार असून हिंदुस्थानच्या पुरुष संघाचे नेतृत्व प्रतीक वाईकरकडे तर प्रियंका इंगळे महिला संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे.
खो-खो खेळात राष्ट्रीय संघटनेवर महाराष्ट्राच्या संघटकांना फारसे महत्त्व नसले तरी संघावर मात्र महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खेळाडूंचाच दबदबा राहिला आहे. तोच दबदबा जागतिक स्पर्धेवरही कायम आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणीनंतर आज हिंदुस्थानचे पुरुष आणि महिलांचे संघ जाहीर करण्यात आले आहे. पुरुष संघात प्रतीक वाईकर (कर्णधार), सुरेश गरगटे, आदित्य गनपुले, रामजी कश्यप, अनिकेत पोटे तर महिला गटात प्रियंका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड यांची निवड झाली आहे. हिंदुस्थानी संघात निवडलेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर उत्तमोत्तम कामगिरी केली आहे. तसेच पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी शिरीन गोडबोले आणि महिलांच्या प्रशिक्षकपदी प्राची वाईकर यांची निवड झाली आहे.
हिंदुस्थानचे खो-खो संघ
- पुरुष संघ – प्रतीक वाईकर (कर्णधार), सचिन भार्गो, सिवा पोथिर रेड्डी, निखिल बी., सुमन बर्मन, पाबनी साबर, सुयर गरगटे, आदित्य गणपुले, आकाश कुमार, अनिकेत पोटे, मेहुल, रामजी कश्यप, गोवथम एम. के., शुभ्रमणी व्ही, एस. रॉकसन सिंग. राखीव – अक्षय भांगरे, राजवर्धन पाटील, विश्वनाथ जानकीराम.
- महिला संघ – प्रियांका इंगळे (कर्णधार), भिलार देवजीभाई, चैत्रा बी, अंशु कुमारी, मिनु, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, निर्मला भाटी, निता देवी, सुभश्री सिंग, मेघी माझी, वैष्णवी बजरंग, मोनिका, नसरीन शेख, नाझी बीबी. राखीव – संपदा मोरे, रितीका सिलोरीया, प्रियांका भोपी.
खो-खो वर्ल्ड कपला महाराष्ट्राचे पाठबळ
महाराष्ट्राच्या मातीत वाढलेल्या मराठमोळ्या खो-खोच्या पहिल्यावहिल्या वर्ल्ड कपसाठी राज्य सरकारने दहा कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ आज जाहीर केले. विशेष म्हणजे राज्य सरकारने खेळाच्या इतिहासात प्रथमच एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी इतका मोठा निधी प्रायोजक म्हणून मंजूर केला आहे.