पलटूरामच्या पंधरा वर्षात पाच कोलांट उड्या, पाचवेळा पक्ष बदलत अखेर चिखलीकर अजित पवार गटात

विजय जोशी, नांदेड
2009 पासून ते आजपर्यंत पाचवेळा पक्ष बदलणार्‍या पलटू राम प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आपल्या राजकीय सोयीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजकारणात गेल्या अडीच दशकापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात नेहमीच खटके उड होते. लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नाहीत, तर लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढविणार असा दृढ निर्धार त्यांनी केला होता. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना विधानसभेची तिकीटही मिळाले.

अशोकराव चव्हाण यांच्यामुळे लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. मराठा आंदोलन तसेच जातीनिहाय मतदारसंघात निर्माण झालेला रोष लक्षात घेता त्यांनी अखेर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. प्रवेशाच्या वेळेस बी फॉर्मही त्यांना मिळाला असून, आता ते लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नात त्यांनी उत्तर देताना मी कुठल्याही पक्षात गेलो तरी स्वगृही परतले अशाच बातम्या येतील, अशी कोपरखळी मारली होती. अपक्ष, लोकभारती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा त्यांचा पक्षप्रवेश चर्चेचा विषय बनलेला असून, आता तरी या पक्षात ते टिकून राहतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.