न्यायालयाने जामीन फेटाळला, कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणारा नागपूरचा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरचा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोरटकरच्या जामीन अर्जावर आज दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यावर चौथे सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी त्याचा जामीन फेटाळून लावला.

जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस संरक्षण असतानाही पळून गेलेल्या कोरटकरला कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणातून जेरबंद केले होते. गेल्यावेळी न्यायालयातून सुनावणीनंतर बाहेर काढतानाही कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा दोन वेळा प्रकार घडल्याने त्यानंतर आज दुसऱ्या वेळीही कोरटकरला न्यायालयात सुरक्षेच्या कारणास्तव कळंबा कारागृह प्रशासनाने दुपारी 1च्या सुमारास व्हीसीद्वारे हजर केले. यावेळी कोरटकरचे वकील अॅड. सौरभ घाग व फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी व्हीसीद्वारे, तर सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी न्यायालयात उपस्थित राहून युक्तिवाद केला. जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकरला जामीन मिळू नये, यामुळे तपासावर परिणाम कशाप्रकारे होऊ शकतो याचे लेखी मुद्दे न्यायालयात सादर केले. कोरटकरवर दाखल असलेली कलमे जामीनपात्र असली तरी सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणारा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने जामीन फेटाळल्याचे कायदेतज्ञांकडून सांगितले गेले.