कोरटकरला कोर्टात प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभा, 17 मार्चपासून कोल्हापूर न्यायालयात सुनावणी

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष हजर न राहता वकिलांतर्फे आपली बाजू मांडण्याचा दिलासा कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून मिळाला आहे. येत्या 17 मार्चपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. दरम्यान, कायद्यातील पळवाटा शोधून कोरटकरला सरकारी संरक्षण मिळत असल्याचा आरोप हस्तक्षेप याचिकाकर्ते दिलीप देसाई यांनी राज्य सरकारवर केला.

आज सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक गळवे उपस्थित होते. सरकारतर्फे विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत कोरटकर याला प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात आज सुनावणी होणार होत़ी  कोरटकरला न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी पोलिसांनी केली. मात्र ती फेटाळण्यात आली. न्यायालयाने 17 मार्चपासून या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

त्वरित अटक झाली पाहिजेअॅड. असीम सरोदे

‘महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या कोरटकरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे चिल्लर म्हणतात; पण सरकारकडून या प्रकरणात विरोधाभास होत आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सोशल मीडियावर कोरटकर याचे मोठय़ा प्रमाणात पह्टो आहेत. इंदूर आणि मुंबईत कोरटकरच्या राहण्याची सोय कोणी केली, हे समोर आले पाहिजे. महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्ये करणाऱ्या कोरटकरला त्वरित अटक झाली पाहिजे,’ अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी केली आहे.