
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारा शिवद्रोही नागपूरच्या प्रशांत कोरटकरची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज सकाळी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या त्याच्या जामीन अर्जावर येत्या 1 एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे कोरटकरची रवानगी थेट कळंबा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. आजच्या या सुनावणीसाठी कोरटकरसह दोन्ही बाजूंचे वकीलही न्यायालयासमोर ऑनलाइन उपस्थित होते.
दोन कार जप्त
प्रशांत कोरटकरविरोधात गुन्हा दाखल होताच अटक होण्याच्या भीतीने त्याने पळून जाणे पसंत केले होते. या काळात त्याने दोन कार वापरल्या होत्या. त्यातील त्याची एक कार, तर दुसरी कार धीरज चौधरी याची होती. या दोन्ही गाडय़ा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या वाहनांवर हल्ला होण्याची शक्यता ओळखून पोलिसांनी दोन्ही कार सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.