कोरटकरला कडक पोलीस बंदोबस्तात आलिशान वाहनातून विमानतळावर सोडले

महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवशंभूद्रोही नागपूरच्या प्रशांत कोरटकरला अखेर आज कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले. धक्कादायक म्हणजे इतर कैद्यांप्रमाणे पोलीस व्हॅनमधून न सोडता कोरटकरला कडक पोलीस बंदोबस्तात पूर्णपणे काळी काच असलेल्या आलिशान गाडीतून विमानतळावर सोडण्यात आले. दरम्यान, कोरटकर विमानाने नागपूरला घरी न जाता मुंबईत गेल्याची माहिती समोर आली आहे.

24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देताना, कोरटकरने राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये केली. समाजमाध्यमांवर हे वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होताच, राज्यभर संतापाची लाट उसळली होती. इंद्रजित सावंत यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गृह खात्याने पोलीस संरक्षण दिले असतानाही कोरटकर पळून गेला. महिनाभराने कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून मुसक्या आवळून त्याला कोल्हापुरात जिल्हा न्यायालयात हजर केले होते.