
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले आहेत.
कोरटकरच्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपत आहे. अशात न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे त्याच्या अडचणी वाढल्या असून त्याच्यावर अटकेची टांगती तलवार कोरटकरच्या डोक्यावर आहे.
कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन दिला आहे. मात्र अंतरिम जामीन न देता त्याच्या अटकपूर्व जामिनावर अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य शासनाने अपील याचिकेत केली आहे. कोरटकरने अंतरिम जामिनाच्या काही अटींचे उल्लंघन केले आहे, असा दावाही राज्य शासनाने केला आहे. तसेच आमची बाजू न ऐकताच कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर केला, असा दावा मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी केला. हा दावा न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकल पीठाने मान्य केला आणि अंतरिम जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले.
काय आहे प्रकरण?
छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आपली भूमिका मांडली होती. हा ब्राह्मण द्वेष असल्याचा आरोप करत तथाकथित पत्रकार कोरटकरने इतिहास अभ्यासक सावंत यांना फोन करून शिवीगाळ केली होती. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी कोल्हापूर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अटकपूर्व जामिनासाठी कोरटकरने कोल्हापूर न्यायालयात अर्ज केला. कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर केला होता. याची मुदत आज संपत आहे.