
राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे प्रशांत कोरटकर याच्यावर कारवाई करावी यासाठी कर्जतमध्ये विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पोलिसांना निवेदन देताना शिवद्रोही कोरटकरला सरकारचे संरक्षण का? असा सवाल करत त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी केली. कारवाईचा बडगा न उगारल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देताना कोरटकर याने राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदवण्यात आले आहेत. मात्र राजकीय आशीर्वादामुळे ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. कर्जतमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि कर्जत मराठा सेवा संघ यांनी रस्त्यावर उतरत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्यासाठी मागणी लावून धरली आहे. कर्जतचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
शेकापचे श्रीकांत आगिवले, चंद्रशेखर दाबणे, महिला स्वीटी बार्शी, शिल्पा लोभी, मिलिंद पोखरे, मच्छिंद्र बार्शी, शंकर देशमुख, रमेश जाधव तर मराठा सेवा संघाचे वसंत कोळंबे, अनिल भोसले, राजेश लाड, अनिल मोरे, सुरेश बोराडे, शिवाजी भासे, अमित जाधव, सुरेश बोराडे, रोहिदास लोभी, विशाल माळी, आकाश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.