
संतप्त शिवप्रेमींच्या कोल्हापुरी पायताणाचा प्रसाद आणि चिल्लर फेकीतून बचाव करताना घाम फुटलेल्या प्रशांत कोरटकर याने महापुरुषांचा अवमान केल्याची आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी दिल्याची कबुली दिल्याचे समोर येत आहे. बुधवारी त्याच्या आवाजाचे नमुने पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाकडून घेण्यात आले होते. त्यातून तो आवाज कोरटकरचाच आहे काय, हे स्पष्ट होणार होते. यासाठी आणखी पाच-सहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता होती. मात्र, आज पोलीस कोठडीत, ‘होय, तो आवाज माझाच…मीच मोबाईलमधील डाटा नष्ट केला’, अशी कबुली कोरटकरने दिल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, उद्या कोरटकर याची तीन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने, पुन्हा एकदा त्याला बंदोबस्तात न्यायालयात हजर केले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पह्न करून धमकी देताना त्याने समाजात तेढ निर्माण करणारीही भाषा वापरली. याबाबत कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच, कोरटकर पोलीस संरक्षण असतानाही पळून गेला होता. प्रारंभी तो आवाज आपला नाही, अशी भूमिका त्याने घेतली. मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट करून तो पोलिसांना देण्यात आला होता.