पोलिसांच्या हातावर तुरी देत प्रशांत कोरटकरचं विदेशात पलायन? कोलकातामार्गे दुबईला पळाल्याची चर्चा, फोटो व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व ताराराणी यांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या पत्नीचीही नुकतीच चौकशी करण्यात आली. अशातच तो चंद्रपूरला असल्याची चर्चा सुरू झाली आणि कोल्हापूर पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाले. मात्र, आता एक धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प्रशांत कोरटकरने विदेशात पलायन केल्याचे वृत्त माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

वृत्तानुसार, प्रशांत कोरटकर हा कोलकातामार्गे दुबईला पळून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेला बळ देणारा त्याचा दुबईतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, कोल्हापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरने यासाठी हायकोर्टाचे दार ठोठावले. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली. अटकपूर्व जामीन याचिकेची प्रत आम्हाला मिळाली नसल्याचे अतिरिक्त सरकारी वकील अजय पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. याचिकेची प्रत सरकारी पक्षाला द्या, असे आदेश न्यायालयाने कोरटकरच्या वकिलाला दिले व ही सुनावणी सोमवार, 24 मार्च 2025 पर्यंत तहकूब केली.

प्रशांत कोरटकरवर डाटा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे पोलिसांना पत्र

पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी विनंती कोरकटकरचे वकील सौरभ घाग यांनी केली. संपूर्ण प्रकरण ऐकल्याशिवाय अटक थांबवण्याचे अंतरिम आदेश देता येणार नाहीत, असे न्यायमूर्ती पाटील यांनी स्पष्ट केले. किमान तोंडी तरी असे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी विनवणी अॅड. घाग यांनी केली. त्यासही न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे कोरटकरला अटक होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशातच तो दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरू झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.