
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱया शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सुनावणीसाठी आणले असता कोरटकरला एका वकिलाने कोल्हापुरी हिसका दाखवला.
‘ए पश्या… हरामखोरा… आमच्या दैवताचा अपमान करतो काय’ असे दरडावत वकील अमितकुमार भोसले यांनी कोरटकरवर हल्ला केला. कोरटकरच्या मानगुटीला पकडत त्यांनी इंगा दाखवला. पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेत कोरटकरला वाचवले. न्यायालयाने कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रशांत कोरटकरविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. एक महिन्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात जाऊन कोरटकरच्या मुसक्या आवळल्या. कोरटकरविरुद्ध शिवप्रेमी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. मंगळवारी (दि. 25) शिवप्रेमी जनतेने राजवाडा पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी केली होती. कोल्हापुरी पायताण दाखवले होते. न्यायालयातून घेऊन जाताना दोन शिवप्रेमींनी पोलीस वाहनाजवळच कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो थोडक्यात बचावला होता.
सकाळी आठ वाजताच न्यायालयात घेऊन गेले
तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे कोरटकरला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, शिवप्रेमी जनतेमधील संताप पाहता पोलिसांनी न्यायालयाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी आठ वाजताच कडक पोलीस बंदोबस्तात त्याला घेऊन गेले. दुपारी बारा वाजता सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांच्यासमोर कोरटकरला हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी कोरटकरला रविवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अॅड. असीम सरोदे आणि अॅड. घाग यांच्यात खडाजंगी
इंद्रजित सावंत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी जोरदार युक्तिवाद केला. कोरटकरला पळून जाण्यास कोणी व कशी मदत केली? त्यांची नावे कोरटकरने पोलिसांना दिली आहेत. यामध्ये धीरज चौधरी हा बुकी आहे. चौधरीचे आलिशान वाहन घेऊन कोरटकर पळून गेला होता. तीन राज्यांत त्याचा वावर होता. त्याने मुक्काम केलेल्या ठिकाणांची तसेच ऑनलाइन पेमेंटचा तपास करायचा आहे. त्यामुळे कोरटकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी अॅड. असीम सरोदे आणि सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केली. कोरटकरचे वकील अॅड. सौरभ घाग यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. कोरटकर एकटाच घरी कमवता आहे. त्याच्या घरी वृद्ध आई, पत्नी व मुलगी आहे असे सांगितले. यावेळी अॅड. सरोदे आणि अॅड. घाग यांच्यात खडाजंगी झाली.
कोल्हापुरी चपलांना कोर्टात बंदी
कोरटकरला धडा शिकवण्यासाठी शिवप्रेमी जनतेने गेल्यावेळी कोल्हापुरी चपला दाखविल्या होत्या. आज पोलिसांनी चक्क कोर्टात कोल्हापुरी चपलांनाच बंदी घातली. चपला घातल्या असतील तर न्यायालयाच्या बाहेर काढा, असे फर्मान पोलिसांनी काढले. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
शिवप्रेमीचा शर्ट फाटला
गेल्यावेळी जयदीप शेळके यांनी न्यायालय परिसरातच कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. आज पोलिसांनी सकाळीच जयदीप शेळके या शिवप्रेमीला ताब्यात घेतले. त्यांचे काहीच ऐकून न घेता फरफटत पोलीस वाहनात बसविण्यात आले. यावेळी शेळके यांचा शर्टही फाटला.