
शिवद्रोही प्रशांत कोरटकर तेलंगणातून अटक करण्यात आली आहे, अशी बातमी सूत्रांच्या आधारे वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. यावरच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना इंद्रजित सावंत म्हणाले की, विकृत व्यक्तीला अटक झाली. ते म्हणाले आहेत की, प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत.
इंद्रजित सावंत म्हणाले की, “एक महिना झाला, महाराष्ट्र आणि देश – विदेशातील सगळ्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक व्हावी, म्हणून विषय लावून धरला. त्या सगळ्या शिवप्रेमींचं मी आभार मानतो, त्यांनी खूप पाठिंबा दिला, त्यामुळे शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलिसांनीही चांगलं काम केलं. विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली आहे. पण जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहील.”
आज त्याच्या कोरटकर यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. याआधीच त्याला अटक झाली आहे. यावर भाष्य करताना इंद्रजित सावंत म्हणाले की, “आमच्या वकिलांनी खूप चांगल्या पद्धतीने बाजू मांडली होती. म्हणून कोल्हापूर न्यायालयात त्याचा जामीन नाकारला गेला. उच्च न्यायालयात सुद्धा तशीच परिस्थिती होती, त्याचा जामीन नाकाला जाऊ शकला असता. त्यामुळेच त्याला महिनाभर वाचविणाऱ्या यंत्रणेने त्याला सल्ला दिला असावा की, आता तुझ्याकडे काही पर्याय नाही आहे. म्हणून त्याने अटक करून घेतली असेल.”
ते म्हणाले, “जी मांडली कोरटकरला सपोर्ट करत होती, अशा मंडळींचा शोध घेतला पाहिजे. तो कुठे राहिला महिनाभर, त्याच्या संपर्कात कोण होतं, त्याला का सपोर्ट करत होते, त्याने काय-काय हालचाली केल्या? या सगळ्या गोष्टी जनतेच्यासमोर आल्या पाहिजेत.”