शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक, सूत्रांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे, अशी बातमी सूत्रांच्या आधारे वृत्तवाहिन्या देत आहेत.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देतानाच, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह मराठा समाजाविषयी गरळ ओकणारा प्रशांत कोरटकर हा गेल्या महिनाभरापासून फरार होता. यातच आज त्याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र याआधीच त्याला तेलंगणातून ताब्यात घेण्यात आल्याची बातमी सूत्रांच्या आधारे वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. लवकरच त्याला कोल्हापुरात आणलं जाणार असल्याची शक्यता आहे. असं असलं तरी अद्याप पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.