नितीशकुमार यांच्या मानसिक आरोग्याचे मेडिकल बुलेटिन जारी करा, प्रशांत किशोर यांची आग्रही मागणी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विविध कार्यक्रमांमध्ये तसेच पत्रकार परिषदांमध्ये बोलण्यापासून रोखले जात आहे. जेणेकरून जनतेसमोर त्यांच्या वागण्याची चर्चा होऊ नये हे लक्षात घेता त्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती सांगणारे मेडिकल बुलेटिन वेळोवेळी जारी करावेत, अशी आग्रही मागणी जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी केली आहे.

शेखपुरा जिह्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर बोलत होते. जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार सातत्याने त्यांच्या वागण्यामुळे प्रसारमाध्यमांमध्येही नेहमीच चर्चेत असतात, याकडेही प्रशांत किशोर यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल सर्वात आधी नितीश कुमार यांचे जवळचे सहकारी दिवंगत सुशील मोदी यांनी 2023 मध्ये चिंता व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांपासून बिहारमधील जनता त्यांचा व्यवहार बघत आहेत. जनतेच्या नजरेतून वाचण्यासाठी नितीश कुमार यांना पत्रकार परिषदांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलण्यापासून परावृत्त केले जात आहे.

कॅबिनेटमधील सहकाऱ्यांची नावेही विसरतात

नितीश कुमार आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची नावेही विसरू लागले आहेत. दौऱ्यादरम्यान ते कुठल्या जिह्यात आहेत हेदेखील त्यांना आठवत नाही. बीपीएससी परीक्षांबद्दल अलीकडेच झालेल्या आंदोलनादरम्यान नितीश कुमार यांना राज्यात होणाऱ्या घटनांबद्दल माहिती नसल्याचे मला कळले, असेही प्रशांत किशोर म्हणाले. त्यामुळे जर त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल मेडिकल बुलेटिन जारी केले तर लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला संभ्रम दूर होईल, परंतु मला ठाम विश्वास आहे की ते याच्याशी सहमत होणार नाहीत, असा टोलाही प्रशांत किशोर यांनी लगावला.