विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्या, त्या गुजरातमधून आणण्यात आल्या होत्या. त्या मशीनमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी 15 टक्के मतदान हे ‘इनबिल्ड’ होते, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. यामुळे हडपसर मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात मतांचा घोळ झाला असण्याची शक्यता असल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे.
विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय पक्षांसह जाणकारांकडून महायुतीला मिळालेल्या बहुमतामुळे ईव्हीएम मशीन्सवर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसरमधील उमेदवार प्रशांत जगताप यांनी फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करीत मतांच्या फेरफारीबाबत आरोप केला आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, ‘हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा पराभव झाला. मला एक लाख 27 हजार 688 मते मिळाली. फक्त 7122 मतांनी पराभव झाला. हडपसर विधानसभा मतदारसंघात असलेल्या 532 बूथवर प्रत्येकी 12 ते 25 याप्रमाणे एकूण नऊ हजारांहून अधिक बोगस मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केला. बोगस मतदानामुळेच माझा पराभव झाला. तसेच मतदान केंद्रामध्ये आम्हाला सहा ते सात ईव्हीएम मशीन्सचे सील तुटलेले आढळले. त्यामुळे त्या ठिकाणी सात हजार मतांचा फेरफार झाल्याचादेखील संशय आहे,’ असे जगताप यांनी नमूद केले.