>> प्रसाद ताम्हनकर
2024 हे वर्ष विविध घटनांनी आणि व्यक्तिविशेषांनी प्रचंड चर्चेत राहिले. मालदीवच्या वादापासून सुरू झालेला सोशल मीडियाचा प्रवास वर्षाच्या शेवटी अल्लू अर्जुनच्या बातमीमुळे चांगलाच टोकदारदेखील झाला. 2024 च्या वर्षात सोशल मीडियावर डॉली चायवाला, शाम रंगीला, विनेश फोगाट यांची जोरदार चर्चा झडली, तर विश्वचषकातील हिंदुस्थानचा विजय, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सूर्याचा कॅच, अंबानींच्या घरचे लग्न, इस्रायल – पॅलेस्टिन आणि रशिया – युक्रेनमधील युद्ध अशा घटनांनी समूह म्हणून लोकांचे विचार कोणत्या दिशेला प्रवास करत आहेत याची एक झलक दाखवली.
वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचे निसर्गरम्य फोटो समाज माध्यमांवर टाकले आणि तेथे पर्यटनाला येण्यासाठी लोकांना आवाहन केले. या आवाहनानंतर अनेक हिंदुस्थानी पर्यटक आणि युजर्सनी मालदीवपेक्षा आता लक्षद्वीपला जास्त प्राधान्य द्यायला हवे, असे मत मांडायला सुरुवात केली. मात्र मालदीवच्या काही सोशल मीडिया इन्प्लुएन्सरना आणि तिथल्या मंत्रिमंडळातील सदस्य मरियम शऊना यांना ही गोष्ट खटकली. त्यांनी यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आणि हिंदुस्थानी लोकांची नाराजी ओढवून घेतली. त्यानंतर तेंडुलकर, अक्षय कुमारसारख्या अनेक सेलिब्रिटींनी पुढे येत याचा निषेध केला आणि पर्यटनासाठी हिंदुस्थानातील विविध बेटांना प्राधान्य देण्याचे मत मांडले.
जगभरातील सोशल मीडिया गाजवला तो आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने बनवण्यात आलेल्या एका चित्राने. या चित्रात इस्रायलच्या हल्ल्यानंतर विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनी लोकांच्या राहुटय़ा दाखवण्यात आल्या होत्या आणि त्याला `ALL EYES ON RAFAH` असे शीर्षक देण्यात आले होते. पाच करोडपेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट पाहिली. या चित्रावरच्या चर्चेत इस्रायलच्या बाजूने आणि इस्रायलच्या विरोधात असे जगभरातील वाचकांचे सरळ सरळ दोन गट पडल्याचे चित्र समोर आले. काही लोकांनी अत्यंत द्वेषपूर्ण विचार मांडले. या लोकांचे समर्थन करणाऱयांची संख्या चिंता वाढवणारी होती. ‘कोण बरोबर, कोण चूक हे सोडा. युद्ध हे सामान्य नागरिकासाठी कायम दुःख घेऊन येणारे असते’ असे समंजस विचार मांडणाऱयांची संख्या अत्यंत कमी दिसली. जे असे विचार मांडत होते त्यांचा आवाजदेखील दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होताना दिसला. हीच परिस्थिती रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावरच्या चर्चेत दिसली.
मोदींची सही सही नक्कल उतरवणारा प्रसिद्ध विनोदवीर शाम रंगीला याने खुद्द मोदींविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आणि तो अचानक चर्चेत आला. त्याच्या घोषणेच्या दिवसापासून ते त्याचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या दिवसापर्यंत अनेक नाटय़पूर्ण घडामोडी घडल्या आणि युजर्सना एक वेगळा अनुभव देऊन गेला. सोशल मीडियात आपल्या अनोख्या चहा बनवण्याच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध असलेला डॉली चायवाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांना भेटला आणि या भेटीने सोशल मीडियाला चांगलेच गाजवले. विशेष म्हणजे आपल्याला भेटलेली व्यक्ती कोण होती, याची आपल्याला कल्पनादेखील नव्हती, असे खुद्द डॉलीने कबूल केले. त्याच्या या विधानानंतर मोठी मनोरंजक चर्चा विविध ठिकाणी घडून आली.
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरचे लग्न आणि त्यात सहभागी झालेले विविध क्षेत्रांतील मान्यवर हे मोठय़ा प्रमाणात सामान्य लोकांच्या टीकेचे लक्ष्य झालेले बघायला मिळाले. एरवी तोरा दाखवणारे काही चित्रपट कलाकार त्या लग्नात ज्या पद्धतीने वावरत होते, त्यावर अनेकांनी तिखट शब्दांचे प्रहार केले. या लग्नावर करण्यात आलेल्या प्रचंड खर्चावरदेखील अनेकांनी आक्षेप नोंदवला. या वादातदेखील ‘त्यांचा पैसा आहे, ते कसेही उडवतील’ आणि ‘असा उधळेपणा चांगला नाही’ असे मत मांडणारे दोन गट समोरासमोर उभे ठाकले होते. वर्ष संपता संपता अल्लू अर्जुनच्या अचानक उपस्थितीमुळे उडालेल्या प्रचंड गोंधळात गर्दीतील एका चाहतीचा मृत्यू झाला आणि त्यासंदर्भात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. कायदा, उच्चभ्रूंना मिळणारी वेगळी वागणूक, चाहत्यांचा अति वेडेपणा आणि राजकारण असे सर्व विषय या एका घटनेने अचानक चर्चेत आले. चर्चेचे हे गुऱहाळ नव्या वर्षातदेखील त्याच जोमाने सुरू आहे.