
>> प्रसाद ताम्हनकर
जगात सर्वात वेगाने वाढ होत असलेले क्षेत्र हे तंत्रज्ञान क्षेत्र आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनानंतर या क्षेत्राला सर्वत्र प्रचंड मागणी आहे आणि जगातील अनेक मोठे उद्योजक यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या प्रचंड उलाढालीत सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे इंटरनेट आणि त्याचा वेग. माहिती तंत्रज्ञानाच्या या विश्वात आपण सहजपणे अनेक कार्य करत असतो. या कार्यासाठी महत्त्वाचे असणारे आणि हे संपूर्ण क्षेत्र ज्यावर अवलंबून आहे, ते इंटरनेट आपल्यापर्यंत पोहोचते कसे याबद्दल मात्र अनेक लोक अनभिज्ञ आहेत.
समुद्राच्या खाली या इंटरनेटच्या तारांचे एक प्रचंड असे जाळे पसरलेले आहे. इंटरनेट वाहून नेणाऱया तारा किंवा फायबर
ऑप्टिक केबल्स म्हणून त्या ओळखल्या जातात. जगातील 95 टक्के डाटा या केबल्समार्फत प्रसारित होत असतो. जगभरातील अनेक महत्त्वाच्या संस्था, सरकारी कार्यालये आणि अब्जावधी लोकांना याचा उपयोग होत असतो. समुद्राखाली असलेल्या या केबल्सचे जाळे जगभरात प्रतिसेकंद 60 कोटी तासांच्या एचडी क्वालिटी व्हिडीओच्या बरोबरीचा डाटा जगभरात प्रसारित करण्याची क्षमता बाळगून आहे. तज्ञांचा असा अंदाज आहे की, येणाऱया प्रत्येक तीन वर्षांनंतर ही क्षमता दुप्पट होत जाईल.
इतक्या महत्त्वाच्या असणाऱया या केबल्सच्या जाळ्याची सुरक्षा मात्र जगभरातील तज्ञांसाठी एक चिंतेचा विषय बनलेली आहे. या महत्त्वपूर्ण केबल्सची म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही आणि सुरक्षादेखील पुरवली जात नाही. गेल्या वर्षी बाल्टिक समुद्रात असलेल्या केबल्सच्या जाळ्याला रशिया आणि चीन या देशांनी लक्ष्य बनवले होते असा आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली होती. बाल्टिक समुद्रातील केबल्सच्या जाळ्याला अपघातामुळे नाही, तर ठरवून केलेल्या हल्ल्यानंतर नुकसान पोहोचले होते आणि त्याचा परिणाम खूप देशांमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यावर झाला होता. हे एक प्रकारे युद्धासारखे असल्याचा आणि राजकीय फायद्यासाठी असे पुन: पुन्हा घडत राहिल्यास त्याचे काय परिणाम भोगावे लागतील ही चिंता आता सगळ्यांना सतावते आहे.
तज्ञ सांगतात की, किनाऱयाजवळ पसरलेल्या केबलला एक मजबूत असे कवच असते. मात्र समुद्रात सोडल्या जाणाऱया केबलला ते नसते. या केबल म्हणजे फायबर ऑप्टिकचे एक बंडल असते आणि त्याच्या आतमध्ये मानवी केसाच्या जाडीच्या तारा असतात, ज्या इंटरनेट डाटा वाहून नेतात. 19 व्या शतकात असलेल्या तंत्रज्ञानापेक्षा सरस अशा आधुनिक तंत्रज्ञानाने या केबल आता बनत असल्या, तरी त्यांना समुद्रात अंथरण्याची पद्धत आजदेखील जुनीच आहे. बोटीच्या मदतीने त्यांना समुद्रतळाशी सोडले जाते. एकदा का त्या तळाशी पोहोचल्या की मग त्यांना हव्या त्या दिशेला ओढत नेले जाते. सध्या समुद्रतळाशी अशा 565 केबल्स अंथरलेल्या असल्याचा अंदाज आहे आणि 15 लाख किलोमीटर लांबीच्या नव्या 83 केबल्स टाकण्याची योजना विचाराधीन आहे.
जगभरात अनेक मार्गांनी पसरलेल्या या केबल्स प्रत्येक मार्गावर एकापेक्षा जास्त प्रमाणात पसरवण्याची गरज असल्याचे तज्ञ सांगतात. त्यामुळे एखाद्या केबलचे नुकसान झाल्यास दुसऱया केबलच्या मदतीने डाटा परिवहन करणे सुलभ होईल. सध्या भूमध्य समुद्रात दक्षिण आफ्रिकेपर्यंत आणि अटलांटिक महासागरात अमेरिका आणि युरोपमध्ये केबलचे असे जाळे पसरलेले आहे. काही केबल्स लाल समुद्रातून (रेड सी) दक्षिण भारत, मग तिथून पुढे सिंगापूर, त्यानंतर दक्षिण चीन समुद्र, फिलिपिन्स, टोकियो, ऑस्ट्रेलिया आणि तेथून पॅसिफिक महासागर ओलांडून अमेरिकेत जातात.
समुद्रात पसरलेल्या या जाळ्याची मालकी मुख्यत तीन प्रकारच्या कंपन्यांकडे आहे. एटी अँड टी, ब्रिटिश टेलिकॉम यांसारख्या काही दिग्गज दूरसंचार कंपन्या, गुगल, फेसबुक, मापोसॉफ्ट यासारख्या तंत्रज्ञान विश्वातील काही बडय़ा कंपन्या आणि अगदी छोटा हिस्सा हा ब्राझील आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशाच्या सरकारांकडे आहे. हे जाळे येत्या 5 ते 6 वर्षांत उत्तर ध्रुवापर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत. केबलचे हे वाढते जाळे आणि त्याची सुरक्षा ही आगामी काळात प्रत्येक देशाच्या सरकारची डोकेदुखी बनणार आहे हे नक्की.