साय-फाय – AIआणि जबाबदारी

>> प्रसाद ताम्हनकर

हिंदुस्थानात सध्या ग्रोक या AIवर आधारित चाटबॉटने धुमाकूळ घातलेला आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा शाखांशी निगडित प्रश्नांना त्याने दिलेली बेधडक उत्तरे असो किंवा एका वापरकर्त्याला त्याने सरळ सरळ वापरलेले अपशब्द असो, त्याची प्रत्येक कृती सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनलेली आहे. राजकारणावर आधारित विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांवर त्याने जी उत्तरे दिली, त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या देखील निशाण्यांवर तो आलेला आहे. ग्रोक असो, चाटजीपीटी असो किंवा AIवर आधारलेले इतर लहानमोठे चाटबॉट असो, हे सर्व बॉट सध्या प्रत्येक देशाच्या सत्ताधारी लोकांची डोकेदुखी बनत चाललेले आहेत आणि पुढे जाऊन सामान्य माणसालादेखील त्याचा फटका बसण्याची चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे.

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यापैकी कोण आवडते? या प्रश्नाला ग्रोक चाटबॉटने अत्यंत चाणाक्षपणे उत्तर दिले, तर इतर काही प्रश्नांची उत्तरे देताना त्याने त्या उत्तरांना समर्पक असे दाखलेदेखील दिले. काही देशांचे अध्यक्ष हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मतदेखील त्याने मांडले. त्याच्या या उत्तरांनी काही समर्थकांना राग आला, काही लोकांची करमणूक झाली तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा वाढता पसारा पाहून काही लोकांची चिंतादेखील वाढली. जगभरातील अनेक तज्ञांनी या विषयावर आता उघडपणे आपले मत मांडण्यास सुरुवात केली आहे.

AIचाटबॉटचे तंत्रज्ञान हे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेले आहे. प्रत्येक चाटबॉटचे तंत्रज्ञान, त्याच्या आवाका आणि मर्यादा या वेगवेगळ्या आहेत. विविध चाटबॉट्सला एकसमान प्रश्न विचारल्यास त्यांची उत्तरे अनेकदा पूर्णपणे भिन्न आणि वेगळा दृष्टिकोन मांडणारी असतात हे स्पष्ट दिसून येते. प्रत्येक चाटबॉट्सला पुरवली जाणारी माहिती ही पक्षपाती असल्याचे यातून स्पष्ट होते असे दिसून येते. चीनने नुकत्याच सादर केलेल्या डीपसीक या AIचे उदाहरण यावेळी तज्ञ देतात. या डीपसीकला ट्रम्प, एलॉन मस्क, मोदी यांच्याविषयी काही टीका करायला सांगितल्यास तो त्वरित काही दाखले आपल्या समोर आणतो आणि या लोकांची धोरणे कशी चूक आहेत यावर भाष्य करतो. मात्र हाच प्रश्न त्याला शी जिनपिंग यांच्याबद्दल विचारल्यास तो त्याचे उत्तर देणे टाळतो. या तंत्रज्ञानाला पुरवली जाणारी माहिती किती महत्त्वाची आहे हे यावरून अधोरेखित होते.

AIला पुरवल्या जाणाऱया माहितीबद्दलदेखील जगभरात अनेक आक्षेप नोंदवले जात आहेत. स्वामित्वाच्या मुद्दय़ावरून अनेक जगप्रसिद्ध मीडिया कंपन्यांनी आणि साहित्यिकांनी AIची निर्मिती करणाऱया कंपन्यांविरुद्ध खटले दाखल केलेले आहेत. AIज्या माहितीच्या आधारावर आपली उत्तरे देतो, ती माहिती त्याला कुठून पुरवली जाते, ही माहिती पुरवताना इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या डाटाचा वापर केला जातो. या डाटामधील अनेक गोष्टी या वर्तमानपत्रातील लेख, तज्ञांनी स्वतच्या अनुभवाचे केलेले लेखन अशा खाजगी प्रकारच्या असतात. ही माहिती AIला पुरवताना त्यांची परवानगी घेतली जाते का? त्यांना त्याची कल्पना दिली जाते का आणि मुख्य म्हणजे जी माहिती पुरवली जाते ती विश्वसनीय आहे हे ठरवण्यासाठी काय यंत्रणा राबवली जाते?

हळूहळू आपल्या रोजच्या जीवनात AIचा वापर वाढत जाणार आहे. काही अर्थाने तो सुखकर आणि आपले श्रम वाचवणारादेखील असणार आहे. मात्र सध्याचा कोणताही AIहा परिपूर्ण नाही. तो शिकतो आहे आणि प्रगल्भ होत आहे. या पांमणाच्या काळात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होत आहे की, AIच्या उत्तराची, त्याच्या कोणत्याही कार्याची जबाबदारी ही कोणावर निश्चित करायची? सध्या या संदर्भात ठोस असा कोणताही कायदा उपलब्ध नाही. उद्या ही यंत्रणा चुकीच्या दिशेने कार्यरत झाल्यास जे काही भयानक संकट उभे राहील, त्याचा सामना करण्यासाठी काही निश्चित धोरण आखले जाणार आहे का? असे महत्त्वाचे प्रश्न या निमित्ताने उभे ठाकले आहेत.