
>> प्रसाद ताम्हनकर
आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्या अफाट कर्तृत्वाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला थक्क केले आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात AI किती प्रगत बनत चालले आहे याचा अनुभव पुन: पुन्हा बघायला मिळत आहे. या वेळी हा अनुभव मिळाला तो लंडनच्या इम्पीरियल कॉलेजचे प्राध्यापक जोस आर. पेनाडेस आणि त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांच्या चमूला. सुपरबग्जची प्रतिकारशक्ती अँटिबायोटिक्सच्या विरोधात का वाढत चालली आहे, यावर ते आणि त्यांचा चमू संशोधन करत आहेत. त्यांनी या संशोधनाच्या संदर्भात एक प्रश्न गुगलच्या `को सायंटिस्ट’ या AI टूलला विचारला. `को सायंटिस्ट’ने अवघ्या 48 तासांत या प्रश्नाचे उत्तर त्यांना दिले. हे उत्तर शोधण्यासाठी पेनाडेस आणि त्यांच्या चमूला अनेक वर्षे खडतर संशोधन करावे लागले होते.
पेनाडेस AI कडून मिळालेले उत्तर पाहून अक्षरश: थक्क झाले. कारण ते सध्या जे संशोधन करत आहेत, ते अजून कुठेही सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध झालेले नाही किंवा ते आणि त्यांचे सहकारी सोडता याबद्दल कोणाकडेही त्यासंदर्भात माहिती उपलब्ध नाही. याचा अर्थ गुगलच्या `को सायंटिस्ट’ला ही माहिती सार्वजनिकरीत्या मिळालेली नाही. `को सायंटिस्ट’ने जे उत्तर दिले ते मिळवण्यासाठी आम्ही आजवरच्या संशोधनाला लागलेल्या वर्षांपैकी सर्वात जास्त म्हणजे 10 वर्षे खर्च केली आहेत, असे ते सांगतात. मात्र AI ने तेच उत्तर मिळवण्यासाठी अवघे 48 तास खर्ची घालवले. आम्ही जर संशोधनाच्या सुरुवातीपासून AI ची मदत घेतली असती तर आमची अनेक वर्षांची मेहनत वाचली असती आणि आज संशोधनाची प्रगतीदेखील खूप पुढच्या टप्प्यावर असती असे पेनाडेस यांनी कबूल केले.
गुगलच्या AI ने शोधलेले उत्तर पाहून संशयात पडलेल्या पेनाडेस यांनी गुगलला ई-मेल करून `गुगलने माझ्या संगणकात प्रवेश केला आहे का?’, `माझ्या संगणकातील माहितीचा आक्सेस गुगलकडे आहे का?’ अशीदेखील विचारणा केली होती. मात्र गुगलने त्यांच्या प्रश्नाला ठामपणे नकार दिला. पेनाडेस म्हणतात, AI ची ही अफाट कार्यक्षमता बघून मी थक्क झालो आहे. गुगलच्या `को सायंटिस्ट’ टूलने त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर फक्त योग्य गृहीतक (हायपोथिसिस) दिले नाही, तर इतर चार पर्यायी गृहीतकेदेखील त्यांना दिली. यातील एका गृहीतकाचा आम्ही कधी विचारदेखील केला नव्हता अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. मी माझ्या संशोधनाच्या बनवलेल्या प्रतीपेक्षा AI ने बनवलेली प्रत अधिक अचूक आणि चांगली असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
संशोधक गेली अनेक वर्षे सुपरबगवर संशोधन करत आहेत. धोकादायक जिवाणू हे प्रतिजैविकांविरुद्ध (अँटिबायोटिक्स) स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढवत नेतात आणि त्यांचे रूपांतर मग सुपरबगमध्ये होते. हे सुपरबग वेगवेगळ्या विषाणूंची एक साखळी तयार करतात आणि त्याद्वारे ते सहज एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पांमित होऊ शकतात. या संशोधनाच्या संदर्भात पेनाडेस यांनी AI ला प्रश्न विचारला होता. त्याने दोन दिवसांत जी चार गृहीतके दिली, त्यातले एक उत्तर पेनाडेस यांच्या आजवर प्रसिद्ध न झालेल्या संशोधनाशी अगदी मिळते-जुळते होते.
संशोधक पेनाडेस यांनी समोर आणलेल्या या अनुभवानंतर पुन्हा एकदा `AI शाप की वरदान?’ यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झडू लागली आहे. पेनाडेस यांचा अनुभव बघता AI विज्ञानाच्या क्षेत्रात एक नवी क्रांती घडवेल असे काही लोकांना वाटत आहे, तर यापुढे मानवी अभ्यासाचे, श्रमाचे काही मूल्य राहणार आहे की नाही? ही चिंता अनेकांना सतावत आहे. अशा वेळी दहापेक्षा जास्त वर्षे खडतर मेहनत घेऊन, अभ्यास करून एका निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या संशोधकाचे कौतुक करावे की त्याच्या दहा वर्षांच्या अभ्यासातून मिळालेल्या उत्तराला अवघ्या 48 तासांत मिळवणाऱ्या AI चे गुणगान करावे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रखर बुद्धिमान अशा संशोधकांच्या गटालादेखील थक्क करणाऱ्या गुगलच्या `को सायंटिस्ट’ने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे हे निश्चित.