>> मेघना साने
आईच्या आजारपणात कर्करोगाबाबत आलेली समज या आजाराच्या जनजागृतीसाठी वापरायची हे ठरवत अरुंधती भालेरावने ‘प्रारंभ कला अॅकेडमी’ची स्थापना केली. या संस्थेद्वारे कलाशिक्षणाबरोबरच कर्करोगाबद्दल समाजात जागृती करण्याचे त्यांचे काम गेली बारा वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
पहिल्यांदाच मातृत्व प्राप्त होऊन ती एका ताह्या बाळाची आई झाली होती. खरंतर बाळाचं कौतुक करायचं, त्याची काळजी घ्यायची आणि स्वतची निगा राखायची यापेक्षा वेगळं तिने काही करणं अपेक्षितच नव्हतं. पण त्यावेळी परिस्थिती काही वेगळीच होती. तिची आई कर्करोगाने आजारी होती.
हॉस्पिटलच्या बेडवर कणाकणाने खंगत होती. ते तिला पाहावं लागणार होतं. एकीकडे बाळाला पाळण्यात झुलवत दुसरीकडे मृत्युशय्येवर असलेल्या आईची सेवा करायची होती. अखेर कर्करोगाने आईचे देहावसान झालं. या तरुण आईचा जीव तिच्या आईसाठी तुटत होता. पण आपणही एका बाळाची आई आहोत हेही विसरता येत नव्हतं. अखेर मातृत्वानंच दिलं बळ आणि ती आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही निश्चय करून उभी राहिली. तिचं नाव अरुंधती भालेराव. तिने मनाशीच संवाद केला- ‘कर्करोग हा भयंकर रोग आहे. तो कुणालाच होऊ नये यासाठी मी झटेन.’ या अरुंधती भालेरावने ‘प्रारंभ कला अॅकेडमी’ची स्थापना करून त्या संस्थेद्वारे कलाशिक्षणाबरोबरच कर्करोगाबद्दल समाजात जागृती करण्यास सुरुवात केली. हे काम ती आणि तिचे सहकारी गेली बारा वर्षं अव्याहतपणे करत आहेत.
खरं तर अरुंधतीची डॉक्टरेट ही वैद्यक शास्त्रातील नव्हती. मास्टर ऑफ ड्रमेटिक्स करून तिने नाटय़शास्त्र विभाग (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ) येथून डॉक्टरेट मिळवली. विद्यार्थ्यांना अभिनय शिकवणे, त्यासाठी शिबिरे घेणे, प्रायोगिक नाटके बसवणे असे काम तिने आपल्या अॅकेडमीमार्फत सुरू केले होते. ‘प्रारंभ कला अॅकेडमी’तर्फे कित्येक नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले होते. हळूहळू या छोटय़ा रोपट्याचा वृक्ष तयार झाला. ज्याला एखादं काम करायची प्रबळ इच्छा असते, त्याला मार्गही दिसू लागतो. डॉ. अरुंधती आपल्या ‘प्रारंभ कला अॅकेडमी’तील पंधरा सुशिक्षित महिला सदस्यांबरोबर काम करत असताना समाजातून कर्करोगाबद्दल वेगवेगळी माहिती मिळवत होती. आदिवासी पाड्यातील गरीब माणसं जर कर्करोगाने ग्रस्त झाली तर ती या रोगाशी झुंज कशी देतील बरे? हा प्रश्न तिला भेडसावू लागला. मुळात पाड्यापाड्यांवर राहणाऱ्या अशिक्षित समाजात कर्करोगाबद्दल जागरुकताच नसेल तर कळणार तरी कसे माणसाला की कर्करोग झालाय म्हणून? कर्करोगाच्या फसव्या पेशी कोणतेही रूप धारण करून शरीरात राहतात. तेव्हा मॅमोग्राफी, सोनोग्राफी, ब्रेस्ट चेकिंग आणि पॅप स्मिअर टेस्ट अशा चाचण्या घ्याव्या लागतात आणि त्यात काही सापडले तर पुढे बायोप्सी. अरुंधतीने ‘प्रारंभ कला अॅकेडमी’तर्फे सामाजिक विभाग सुरू केला.
सेवाभावी व वेगवेगळ्या क्षेत्रांतील निष्णात डॉक्टर्स आणि तीस-पस्तीस स्वयंसेवकांची फौज घेऊन ती पाडय़ापाडय़ांवर फिरू लागली. तिचा उद्देश जरी चांगला होता आणि ‘प्रारंभ कला अॅकेडमी’तर्फे मोफत तपासणी जाहीर केली होती तरी तिला यश मिळणे इतके सोपे नव्हते. अॅकेडमीची मेडिकल व्हॅन पाड्यावर आली की आदिवासी घाबरून पळून जात होते. आपण अनोळखी असल्यामुळे ते आपल्यावर लगेच विश्वास ठेवणार नाहीत हे तिच्या लक्षात आले. मग तिने स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने त्यांच्याशी संवाद साधला. हळूहळू आदिवासींची भीड चेपू लागली. डॉ. अरुंधती आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पाडय़ातील घराघरात जाऊन समुपदेशन करू लागली. हळूहळू आदिवासींमधे कर्करोगाविषयी जागृती होऊ लागली. ‘प्रारंभ कला अॅकेडमी’ची कर्करोग तपासणी शिबिरे (कॅम्पस) गेली बारा वर्षं वाडा, उरण, पिंपळास (भिवंडी) येथील ग्रामीण व आदिवासी समाजात, तसंच ठाण्यातील घरकाम करणाऱया महिलांसाठीही झाली आहेत. या आरोग्य तपासणी उपक्रमांमध्ये डॉ. रेखा थोटे, डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर, डॉ. संध्या सहारन, डॉ. दीपश्री डोंबे, डॉ.अश्विनी देशमुख, डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ. ऋजुता पाटील इत्यादी अनेक डॉक्टरांचे सहकार्य लाभल्यामुळे हे सर्व शक्य झाले.
स्त्रियांनी या शिबिरात तपासणीला यावं यासाठी हळदीकुंकूसुद्धा केलं. स्टीलची ताट-वाटी वाण म्हणून दिलं. तपासणी करून घेणाऱया महिलेलाच हे वाण दिलं जात होतं. मात्र गर्भाशयाची तपासणी करण्यासाठी जी उपकरणे वापरली जातात त्यांची भीती महिलांच्या मनात असते आणि त्या इतर महिलांनाही घाबरवतात. इतक्या अडचणींना तोंड देऊन तपासणी झाली आणि एखादीच्या शरीरात कर्करोगाची चिन्हे आढळली तर तिच्या घरचे बायोप्सी करायला तयार होत नाहीत. रोज कामावर जाणं ही त्यांची गरज असते. तपासणी शिबीरसुद्धा दिवसभर उघडं ठेवावं लागतं. हातावर पोट असल्यामुळे लोक त्यांना वेळ असेल तेव्हा तपासणीला येत.
सुरुवातीला शिबिराचा सर्व खर्च ‘प्रारंभ कला अॅकेडमी’ करीत होती. पण जसजसा व्याप वाढत गेला तसतसा खर्चही वाढत गेला. आता जेएनपीटी, उरण यांच्याशी ‘प्रारंभ’चा टायअप झाल्यामुळे उरण परिसरातील उपक्रमांसाठीचा आर्थिक भार बराचसा कमी झाला आहे. ‘प्रारंभ’चा असा ठाम विश्वास आहे की, स्त्राr ही घराचा, समाजाचा कणा आहे. हा कणा जर मजबूत असेल, त्यांचं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल, सक्षम असेल तर एका उन्नत घराची, एका उन्नत समाजाची, पर्यायाने एका मजबूत, संपन्न देशाच्या स्वप्नांची पूर्तता लवकर होईल.
महिलांसाठी निरनिराळे उपक्रम राबवणाऱया ‘प्रारंभ कला अॅकेडमी’चा बाराव्या महिला महोत्सवाचा सांगता समारंभ 1 डिसेंबर 2024 रोजी ठाण्यातील आर मॉलच्या रिट्झ बँक्वेटमधे संपन्न झाला. या तपपूर्ती सोहळ्याला महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या व त्यांनी मोठय़ा उत्साहाने व्यासपीठावर त्यांची कला सादर केली. अभिनेत्री अदिती सारंगधर आणि श्रेया बुगडे उपस्थित असल्याने महिलांच्या आनंदात भर पडली होती. डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, पत्रकार, कलाकार अशी अनेक क्षेत्रांतील मान्यवर मंडळी पाहुणे म्हणून उपस्थित होती. त्यांच्यासमोर ‘प्रारंभ कला अॅकॅडमी’ने आपला नवा उपक्रम जाहीर केला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एक गाव दत्तक घेतलं होतं. ग्रामीण महिलांनी नवऱ्याच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता स्वतचा छोटासा व्यवसाय सुरू करावा यासाठी डॉ. अरुंधती आणि सहकारी हे महिलांना सर्वांगाने सक्षम करण्यासाठी झटत आहेत. याचे व्हिडीओ महोत्सवात पडद्यावर दाखवण्यात आले. ‘प्रारंभ कला अॅकेडमी’च्या उपक्रमांमधे मनीषा आचार्य, वैशाली कुलकर्णी, कीर्ती केरकर, वैशाली परड, जयश्री मदने, स्नेहल पुरंदरे, स्नेहल रवंदे, रागिणी साने या तिच्या सहकारी मैत्रिणी कार्यरत असतात. समाजानेदेखील तिच्या या कार्याची दखल घेऊन तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.