लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मनसेचे प्रकाश महाजन यांची जीभ घसरली आहे. प्रकाश महाजन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रातील माळी आणि तेली समाजात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील माळी आणि तेली समाज आक्रमक झाला आहे.
प्रकाश महाजन यांचा तोल सुटला
राहुल गांधींचा आमच्या हिंदू धर्माशी काय संबंध? असा प्रश्न करतानाच माँ माली… बाप तेली… बेटे निकले सय्यद अली… अशा प्रकारची वादग्रस्त भाषा त्यांनी वापरली आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश महाजन यांनी ही वादग्रस्त भाषा वापरली. यानंतर संपूर्ण माळी आणि तेली समाजात संतापाची लाट उसळली आहे.
प्रकाश महाजन यांच्या वादग्रस्त वक्तव्यनंतर राज्यातील माळी आणि तेली समाज नाराज झाला आहे. माळी आणि तेली समाजाने प्रकाश महाजन यांचा निषेध केला आहे. तसेच प्रकाश महाजन यांनी तेली व माळी समाजाची माफी मागावी, अशी मागणी बृहन महाराष्ट्र तेली समाजचे अध्यक्ष विलास वाव्हळ यांनी केली आहे.
लोकसभेत काय घडलं?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपच्या नकली हिंदूत्वावर टीका केली. पण पंतप्रधान मोदी आणि भाजपने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप केला. यावरून राहुल गांधी यांनी सभागृहातच पंतप्रधान मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. भाजपने हिंदूंचा ठेका घेतलेला नाही, टोला राहुल गांधी यांनी लगावला.