प्रकाश बिडवलकरच्या मारेकऱ्यांना फाशी द्या! हृदय पिळवटून टाकणारे हत्या प्रकरण, उघडकीस आल्यानंतर मामीची मागणी

कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर (35) याची दोन वर्षांपूर्वी अपहरणानंतर मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आरोपींचे चेहरेही उघडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश यांच्या मामी माधवी चव्हाण यांनी आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली आहे.

माधवी चव्हाण यांनी याबाबत निवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, निवती व कुडाळ पेलिसांनी संयुक्त कारवाई करत चार संशयितांना अटक करत वेगाने तपासाला सुरुवात केला. पैशाच्या देवघेवीतून बिडवलकर यांना आधी नग्न करून त्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, माधवी चव्हार यांनी माध्यमांशी बोलताना दोन वर्षांपूर्वी काही लोक प्रकाश उर्फ सिद्धीविनायक याला घरातून घेऊन गेले. तो त्यांच्याकडे कामाला होता. मात्र त्यानंतर दोन वर्ष त्याची माहिती मिळाली नाही.

प्रकरणातील घडामोडी

कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर यांचे अपहरण करून त्यांना केलेल्या मारहाणीत प्रकाश यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह कुडाळवरून सातार्डा येथे नेऊन जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

2023 मध्ये घडलेल्या या खूनप्रकरणी निवती पोलिसांनी सिद्धेश अशोक शिरसाट (44, रा. कुडाळ), गणेश कृष्णा नार्वेकर (33, रा. माणगाव), सर्वेश भास्कर केरकर (29, रा. सातार्डा, ता. सावंतवाडी) आणि अमोल ऊर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट (रा. पिंगुळी, ता. कुडाळ) या चौघांना अटक केली होती.

 या खून प्रकरणात वापरण्यात आलेली इर्टिका गाडी ही कुडाळ बाजारपेठ येथील इम्रान उस्मान शेख यांची असून संशयित सिद्धेश शिरसाट यानेच ती भाडय़ासाठी मागितली होती, मात्र इम्रान शेखला कशासाठी गाडी हवी ते सांगितले नव्हते. यासाठी भाडे म्हणून 2200 रुपये वाहनधारक इम्रान उस्मान शेख याला दिले होते असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती तपासी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, यातील पोलीस तपासात वेगवेगळे विषय समोर येत आहेत. यात प्रकाश बिडवलकर याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण दोन गाडय़ांचा वापर करण्यात आला होता. यातील एक गाडी पोलिसांनी सोमवारी जप्त केली आहे. ही गाडी कुडाळ बाजारपेठ येथील इम्रान शेख यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोपींना न्यायालयीन कोठडी!

तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उैर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील संशयित आरोपी गणेश कृष्णा नार्वेकर, सर्वेश भास्कर केरकर यांची पेलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी अबाधित राखून  28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील चारही संशयितांची पोलीस कोठडी मंगळवारी संपली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमोल शिरसाट व सिध्देश शिरसाट या दोघांना यापूर्वीच पोलीस कोठडी अबाधित राखून 24 एप्रिल पर्यंत कुडाळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.