राज्य सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेमध्ये महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर शेतकरी पुत्रांसाठी लाडका भाऊ योजना काढावी, अशी या शेतकरी पुत्राची लक्षवेधी मागणी आहे. भंडारा जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याने एक फलक हातात घेतला आणि तो थेट गावाच्या चौकात उभा ठाकला. या तरुण शेतकऱ्याकडे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष लागले होते. शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, जमले तर ‘लाडका भाऊ’ योजनासुद्धा आणा, अशी मागणी भंडाऱ्यातील या शेतकरी पुत्राने केली आहे. एखादी योजना काढून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी पुत्रांना दिलासा द्यावा, अशी या तरुणाची मागणी आहे.
भंडारा जिल्ह्यातील जयपाल प्रकाश भांडारकर असे या तरुणाचे नाव असून, तो पदवीचे शिक्षण घेत आहे. जयपाल याच्याकडे सहा एकर स्वतःची शेती असून त्यात तो भात पिकासह, बागायती शेती करून उत्पन्न घेतो. मात्र, शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मुलीही मिळत नसल्याची खंत या युवा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याने जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.