सरकार मराठ्यांना आरक्षणावर झुलवत ठेवतेय, प्रकाश आंबेडकर यांची टीका

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचे असून त्यांनी सरकारला जेरीस आणले आहे. मात्र, आरक्षणावर सरकार झुलवत ठेवत आहे. सरकार जरांगे यांना फसवणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे – पाटील यांना दिला. प्रकाश आंबेडकर हे धाराशिव येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अर्जुन सलगर, सचिन शेंडगे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठ्यांना मनोज जरांगे न्याय देऊ शकतील. गरीब मराठ्याला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीतून कायदेशीर अडचणीमुळे देता येणार नाही, त्यामुळे गरीब मराठा असा वेगळा गट तयार करावा. रस्त्यावर उतरून ठिणगी पेटण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे वाद घालू नये, सुप्रीम कोर्टाचे आरक्षणाबाबत नियम पाळावे, असे आंबेडकर म्हणाले.

श्रीमंत मराठा आतुरतेने लोकसभेची वाट पाहत आहे. ते आंदोलन जिरवतील. निजामी मराठ्यांनी आजवर अनेक आंदोलने जिरवली, हे आंदोलन जिरणार नाही याची काळजी घ्यावी. लोकसभा महत्त्वाची आहे. गरीब मराठाबाबत निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी होऊ शकतो. जरांगे यांनी लोकसभा भूमिकेबाबत ठोस निर्णयासाठी विचार करायला हवा, असे आंबेडकर म्हणाले. आरक्षणाच्या मुद्याला घेऊन मराठा व ओबीसी समाज उभा ठाकला आहे. या दोन्ही समाजात मी मध्यस्थी करण्यास तयार आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यास विरोध नाही; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती. अगोदर आपण कुठल्या पदावर आहोत हे पाहायला हवे, आपले पंतप्रधानपद जाईल या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.