नव्या जातीला जन्म देण्याचा अधिकार सरकारला नाही! प्रकाश आंबेडकर यांनी खडसावले

देशाचे संविधान बदलण्याचा भाजपचा मनसुबा आहे. संविधान टिकले तरच सर्वांचे आरक्षण टिकेल. नव्या जातीला जन्म देण्याचा अधिकार सरकारला नाही. एखादा समाज मागास आहे की, नाही एवढेच ठरवण्याचे काम सरकारचे आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खडसावले.

नांदेड जिल्हा ओबीसी जनमोर्चाच्या वतीने रविवारी नरसी येथे पार पडलेल्या ओबीसी आरक्षण बचाव महामेळाव्यात प्रकाश आंबेडकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकाश शेंडगे, टी.पी.मुंडे, माजी खासदार विकास महात्मे, सचिन नाईक, अविनाश भोसीकर, महेंद्र देमगुंडे, बालाजी तुप्पेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बारा बलुतेदारांच्या हाती सत्ता जाऊ द्यायची नाही, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट आहे. देशाचे संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे. भाजप याच अजेंड्यावर सध्या काम करत आहे. देशाचे संविधान टिकवणे ही आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत सत्ताबदल करणे गरजेचे आहे. संविधान टिकले तरच सर्वांचे आरक्षणही टिकेल, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

केंद्राने अधिकार काढून घेतल्याने आता राज्य शासनाला नव्याने ओबीसीत कुणालाही समाविष्ट करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नव्या जातीला जन्म देण्याचा अधिकार सरकारला नाही, असे खडसावून सांगतानाच एखादा समाज मागास आहे की, नाही एवढेच स्पष्ट करण्याचे काम राज्य सरकारकडे असल्याचेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचेही भाषण झाले.

त्यांनी आरक्षणाचे वेगळे ताट घ्यावे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या चळवळीचे स्वागत आहे. परंतु त्यांनी ओबीसीच्या ताटातील आरक्षण मागू नये, त्यांनी आपले आरक्षणाचे ताट वेगळे घ्यावे, अशी स्पष्ट भूमिकाही यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.