स्त्रीभ्रूणहत्येमागे परराज्यातील टोळी, अजामीनपात्र गुन्ह्यासंदर्भात विधेयक आणण्याचे आश्वासन

प्रातिनिधिक

महाराष्ट्रात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार वाढले असून त्यामागे परराज्यातील टोळी सक्रिय असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत सांगितले. भ्रूणहत्येचा गुन्हा अजामीनपात्र करण्यासाठी विधेयक आणले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, बुलढाणा, नांदेड, जालना आदी जिह्यांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार समोर आले आहेत. कोल्हापुरात अशा 22 घटनांची नोंद झाली, असा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे भाजपच्या श्वेता महाले यांनी उपस्थित केला होता. या घटनांचे धागेदोरे महाराष्ट्राच्या सीमावर्ती परराज्यांतील जिह्यांमध्ये असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.