परिवर्तन महाशक्ती स्थापन करून मतदारांना तिसरा पर्याय देणाऱ्या प्रहारच्या बच्चू कडूंना त्यांच्याच उमेदवाराने तोंडावर पाडले आहे. कडू यांच्या अमरावतीच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या उमेदवारात थेट लढत होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली. महाशक्तीने राज्यात 121 उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू राज्यभरात सभा घेत आहेत. पण कडू यांचे अमरावतीतील उमेदवार डॉ. सय्यद अब्रार यांनी चार दिवसांपूर्वीच काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा केली आणि आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता अमरावती विधानसभेत काँग्रेसचे सुनील देशमुख विरुद्ध अजित पवार गटाच्या सुलभा खोडके अशी थेट लढत होणार आहे.