प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 45 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे शानदार आणि दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात पश्चिम उपनगरातील 300 पेक्षा अधिक शाळा आणि चार हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या आंतरशालेय महोत्सवात कबड्डी, खो-खो, मल्लखांब या मराठमोळ्या खेळांसह ऍथलेटिक्स, बुद्धिबळ, कराटे टेनिस, जलतरण आणि तिरंदाजी अशा विविध खेळांचाही समावेश असल्यामुळे या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उपनगरातील शालेय क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळवून देणाऱया प्रबोधन आमचे आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रबोधन क्रीडा भवन येथे संस्थापक सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय जलतरणपटू अवंतिका देसाईने प्रबोधन क्रीडानगरीत क्रीडा ज्योत फिरवून औपचारिकरीत्या महोत्सवाची ज्योत प्रज्वलीत केली. तत्प्रसंगी आमदार बाळा नर, ‘सुप्रिया लाइफ सायन्स कंपनी’चे अध्यक्ष सतीश वाघ, ‘सावंत प्रोसेस सोल्युशन्स’चे सीईओ संदीप सावंत, एमडी नितीन सावंत, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष कैलास शिंदे, प्रबोधन गोरेगावचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे, कोषाध्यक्ष रमेश इस्वलकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
प्रबोधन गोरेगावच्या यंदाच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात वांद्रे ते दहिसर या भागातील सुमारे 300 शाळा सहभागी झाल्या आहेत. या शाळांमधील चार हजार विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात सहभागी होणार आहेत. संस्थापक सुभाष देसाई यांनी या क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत.