पोलीस डायरी – महाराष्ट्र कलंकित होत आहे! महिलांवरील अत्याचार वाढले

>> प्रभाकर पवार

2024 साल अखेर संपले, परंतु मुंबई, पुणे व बीडमध्ये सूडनाट्यांच्या अक्षरशः ठिणग्या उडालेल्या दिसल्या. एका आमदाराने पोलीस ठाण्यातच अंदाधुंद गोळीबार करून एका माजी नगरसेवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात दोन माजी नगरसेवक, एक माजी मंत्री व तीन सरपंच अशा अर्धा डझन लोकप्रतिनिधींच्या हत्या करण्यात आल्या.

2024 च्या पहिल्याच आठवड्यात खून, खुनाचा प्रयत्न आदी बऱ्याच गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व जेलमधून बाहेर आलेल्या शरद मोहोळ या पहेलवान गुंडाची कोथरुड येथील त्याच्या घराजवळ 5 जानेवारी 2024 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळच्या हत्येची चर्चा सुरू असतानाच मुंबईतील बोरिवली (प.) आयसी कॉलनीमध्ये 8 फेब्रुवारी 2024 रोजी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकप्रिय माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा या माथेफिरूने आपल्या कार्यालयात बोलावून गोळ्या घालून हत्या केली. अभिषेकला मारल्यानंतर मॉरिसने स्वतःच्या कानशिलात एक गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केली.

डॉ. रश्मी शुक्ला यांनी 4 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे सहसचिव व्यंकटेश महाजन यांनी जारी केले. 2024 च्या जूनअखेरीस शुक्ला सेवानिवृत्त होणार होत्या. परंतु भाजप सरकारने त्यांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देऊन साऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवून दिली. इतकी मोठी मुदतवाढ कोणत्याही पोलीस महासंचालकाला यापूर्वी देण्यात आली नव्हती.

रश्मी शुक्ला यांनी ‘डीजीपी’ पदाचा चार्ज घेतल्यानंतर महिनाभरातच कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले गणपत काळू गायकवाड यांनी 9 फेब्रुवारी 2024 रोजी कल्याणच्या हिल लाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक व कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार गायकवाड यांना अटक करण्यात आली. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमदार गायकवाड यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4.45 वाजता प्रख्यात सिने अभिनेता सलमान खान याच्या वांद्रयाच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंट या निवासस्थानी पंजाबचा बडा गैंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्या इशाऱ्यावरून गोळीबार करण्यात आला. परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटेच्या वेळी घराबाहेर गोळीबार करून पळालेल्या विकी गुप्ता व सागर पाल या यूपी-बिहारच्या बेकार तरुणांना मुंबई क्राइम ब्रँचच्या वांद्रे युनिटने गुजरातच्या भुज येथे धाड घालून अटक केली. त्यानंतर पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पनवेल येथील सलमान खानच्या फार्म हाऊसजवळ सलमानवर पाळत ठेवणाऱ्या कटात सामील असलेल्या दीड डझन आरोपींना अटक केली.

आमदार गणपत गायकवाड प्रकरण गाजत असतानाच नीट घोटाळा व आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण समोर आले. आयएएस अधिकारी होण्यासाठी पुण्याच्या पूजा खेडकर हिने आपण अपंग असल्याची खोटी प्रमाणपत्रे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे सादर करून मागासवर्गीय कोट्यातील आयएएसपद मिळविले होते. परंतु पूजा खेडकर हिने आपल्या प्रशिक्षण काळातच आयएएस अधिकाऱ्याचा रुबाब दाखविल्याने तिचे पितळ उघडे पडले खोटी नावे व प्रमाणपत्र सादर करणाऱ्या पूजा खेडकरला केंद्रीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

पुण्याच्या कल्याणी नगरात 19 मे 2024 रोजी मध्यरात्री ‘पोर्शे’ ही महागडी कार दारूच्या नशेत चालविणाऱ्या नामांकित अग्रवाल बिल्डरच्या वेद अग्रवाल या अल्पवयीन मुलाने एका तरुण-तरुणीला आपल्या कारने उडविले. त्यात अतिश अवधिया व अश्विनी कोस्टा या पंचविशीतील दोन आयटी इंजिनीयर यांचा मृत्यू झाला हे प्रकरण गाजत असतानाच 7 जुलै 2024 रोजी मिहिर शहा या मद्यपी तरुणाने पहाटेच्या वेळेस वरळी येथे प्रदीप नाखवा व कावेरी नाखवा या पती-पत्नीला आपल्या बीएमडब्ल्यू कारने ठोकले. त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला ‘हीट अॅण्ड रन’ची ही दोन प्रकरणे 2024 सालात चांगलीच गाजली.

13 व 14 ऑगस्टच्या दरम्यान बदलापूर येथे एका शाळेत अक्षय शिंदे या कामगाराने शाळेतील चार ते सहा वयोगटातील दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यावर बदलापुरात जनक्षोभ उसळला. लोकांनी रस्त्यावर उतरून 10 तास रेल्वे रोखली. शहर बंद पाडले. त्यानंतर अक्षय शिंदेला 23 सप्टेंबर 2024 रोजी तपासाला नेत असताना मुंब्याजवळ संजय शिंदे या पोलीस निरीक्षकाने पोलीस व्हॅनमध्येच गोळ्या घालून (चकमकीच्या नावाखाली) ठार मारले व जनतेची वाहवा मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु ही कथित चकमक वादग्रस्त ठरली न्यायालयाने सीआयडी चौकशीचे आदेश दिले त्यामुळे अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या कल्याणच्या विशाल गवळी या सीरियल किलर नराधमाला पोलिसांनी चकमकीत ठार मारण्याचे धाडस केले नाही.

भांडण झाल्यामुळे आपल्या घरातून बाहेर पडलेल्या व शांतीसाठी ठाणे, शिळगाव येथील घोळ गणपतीच्या मंदिरात गेलेल्या एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर मंदिरातील श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (62, कोटा राजस्थान), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (45, उत्तर प्रदेश) आणि राजकुमार रामफेर पांडे (54, उत्तर प्रदेश) या तिघा पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिची 9 जुलै 2024 रोजी हत्या केली. ही संतापजनक घटना ताजी असतानाच 25 जुलै 2024 रोजी उरण शहरातील पदवीधर तरुण मुलगी यशश्री शिंदे हिची तिच्या शाळेतील दाऊद शेख या तरुणाने लग्नास नकार दिला म्हणून अत्यंत क्रूररीत्या हत्या केली.

पुण्यात गैंगवॉरचा पुन्हा भडका उडाला. एकेकाळचा पुण्याचा बडा गैंगस्टर सूर्यकांत ऊर्फ बंडू अआंबेकर (68) याचा नगरसेवक असलेला मुलगा वनराज आंबेकर याची त्याच्याच कुटुंबियांनी मालमत्तेच्या वादातून कोयता गैंगला सुपारी देऊन हत्या केली.

ज्या बिष्णोई टोळीने सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केला होता, त्याच टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी राज्यमंत्री झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्दिकी ऊर्फ बाबा सिद्दिकी (66) यांची वांद्रे पूर्व निर्मलनगर येथे 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या घालून हत्या केली. या हत्येप्रकरणी लॉरेन्सचा भाऊ अनमोल यास अमेरिकेत तर अन्य 26 आरोपींना उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब व महाराष्ट्रातील डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, अकोला, अंबरनाथ आदी भागांतून मुंबई क्राइम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. अनमोलची माहिती देणाऱ्यास भारताने 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर अनमोल हा अमेरिकन पोलिसांच्या एन्फोर्समेंट अॅथॉरिटीकडून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पकडला गेला. सलमान खानचा जवळचा मित्र असल्याने व दाऊद टोळीशी संबंध असल्याच्या संशयाने बाबा सिद्दिकीची हत्या घडवून आणण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बीड हा संत भगवान बाबा यांचा वारसा असलेला जिल्हा, परंतु फडणवीस काळात या जिल्ह्यात 2024 सालात प्रचंड गुन्हेगारी वाढलेली दिसून आली. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूररीत्या हत्या करण्यात आली, तर परळी तालुक्यातील मरळ वाडीतील सरपंच बापू आंधळे यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले ‘गैंग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील हिंसाचाराची आठवण व्हावी इतकी हिंसा 2024 सालात बीड जिल्ह्यात दिसून आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 23 दिवस फरार असलेला वाल्मीक कराड हा आरोपी (अन्न व पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा सहकारी) पुणे सीआयडी पोलिसांना 31 डिसेंबर रोजी शरण गेला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

2024 च्या डिसेंबर महिन्यात कुर्ला येथील बस अपघातात 9 जण ठार तर गेटवेजवळ बोट अपघातात 15 जणांना आपले जीव गमवावे लागले. मुंबईत 2024 सालात महिलांच्या अत्याचारात प्रचंड वाढ झालेली दिसून आली. 1 हजार प्रौढ व अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आले. 1200 अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. 2500 महिलांचा विनयभंग करण्यात आला. महिलांवरील अत्याचाराचा आतापर्यंतचा हा ‘रेकॉर्ड’ म्हणावा लागेल. लाडक्या बहिणीना 1500 रुपयांचे आमिष दाखविणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी डिजिटल अटकेची भीती दाखवून अनेक तरुणींना नग्न करून त्यांच्याकडून सायबर माफियांनी लाखो रुपये उकळले आहेत. वृद्धांना सायबर माफिया रस्त्यावर आणत आहेत. मुलगा न झाल्याने किंवा अपत्य नसलेल्या महिलांना जिवंत जाळले जात आहे. असे विकृत मेंदू ठेचायचे असतील तर कडक कायद्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. परंतु याबाबत राज्यकर्ते गंभीर नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र दिवसेंदिवस कलंकित होत आहे.

[email protected]