पोलीस डायरी – ‘डिजिटल’ अटकेचे भय संपत नाही; महिलांना रोज नग्न केले जात आहे

>> प्रभाकर पवार

महाराष्ट्रात महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करून महायुती सरकार आपली रोज पाठ थोपटून घेत आहे. परंतु सरकारच्या त्याच लाडक्या बहिणीची सायबर माफियांकडून रोज लाखो करोडो रुपयांची फसवणूक केली जात आहे डिजिटल अटक करून काहींना नग्न करण्यात येत आहे. हे लांच्छनास्पद प्रकार मुंबईसह देशभरात रोज सुरू असताना सत्ताधारी लाडके भाऊ मात्र सत्तेत मश्गुल आहेत. अंधेरी (पूर्व) पवई येथे एका 36 वर्षीय वकील महिलेला ‘डिजिटल अटके’च्या नावाखाली ताब्यात घेऊन तिला एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले गेले व तिचे सर्व कपडे काढले गेले. त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून 7 लाख रुपये उकळले गेले. ही घटना ताजी असतानाच अंधेरीच्याच एका तरुणीवर अलीकडे असा दुर्दैवी प्रसंग ओढवला. व्हिडीओ कॉल करणाऱ्या एका अज्ञात भामट्याने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे त्या तरुणीला भासवले. तो म्हणाला, आपल्याविरुद्ध आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. आपण फ्रॉड केला असल्याची आमच्याकडे कागदपत्रे आहेत. त्यासाठी आपली गुप्त ठिकाणी चौकशी करणे भाग आहे. आम्ही सांगतो त्याप्रमाणे हॉटेलमध्ये एक रूम बुक करा. आम्ही आपणास डिजिटल अटक केली आहे हे मात्र विसरू नका, असेही तो इसम त्या तरुणीला बजावतो. ती तरुणी घाबरते. सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या त्या इसमाच्या सांगण्याप्रमाणे ती तरुणी घाबरून आपली अंगवस्त्रे काढते आणि फसते. नग्न फोटो काढल्यानंतर त्या तरुणीला ब्लॅकमेल करण्यात येते. तरीही ती तरुणी पैसे देण्यास टाळाटाळ करते. जेव्हा त्या भामट्याने त्या तरुणीचे नग्न फोटो
समाजमाध्यम, नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये व्हायरल केले तेव्हा त्या तरुणीने २ लाख रुपये आपल्या बँक खात्यातून भामट्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. तरीही अधिक पैशांसाठी धमक्यांचे फोन येऊ लागल्याने त्या तरुणीने अंधेरी पोलिसांकडे नुकतीच धाव घेतली आणि तक्रार केली.

महिलांबाबत असे रोज प्रकार घडत असताना मात्र आमचे लाडके (राज्यकर्ते) भाऊ या दुर्दैवी महिलांचे पैसे परत मिळावेत, आरोपींना अद्दल घडावी यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. महिला या सॉफ्ट टार्गेट असतात. मित्रपरिवार, नातेवाईकांमध्ये अश्लील फोटो व्हायरल केले की बदनामीच्या भीतीने बऱ्याच महिला वाटेल तेवढे पैसे आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. हे माहीत असल्याने सायबर माफिया अगदी क्रूरपणे त्यांच्याशी वागत आहेत. काही महिला सायबर माफियांच्या छळाला कंटाळून आत्महत्याही करत आहेत. याबाबत मी वारंवार याच स्तंभात लिहिले आहे. अनोळखी
व्यक्तीपासून सावध राहण्याचे व्हिडीओ. ऑडिओ कॉलला प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे. परंतु जनतेत हवी तशी जनजागृती नसल्याने व पोलिसांची पूर्वापार भीती वाटत असल्याने बहुसंख्य महिला घाबरून जातात व अज्ञात व्यक्ती सांगेल, बोलेल त्यावर विश्वास ठेवतात. पोलीस, सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांविषयी जनतेमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी आता पोलिसांनीच पुढाकार घेतला पाहिजे. निवासी, व्यापारी संकुल, शाळा, कॉलेज तसेच विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून जनतेमध्ये सायबर माफियांपासून सावध राहण्याचे आवाहन केले पाहिजे.

देशभरात डिजिटल अटकेची भीती दाखवून गेल्या वर्षभरात 65 हजार लोकांना दीड हजार कोटी रुपयांना फसविण्यात आले आहे. त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. लव्ह जिहादला बळी पडलेल्या तरुणींसाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर येतात. पोलीस ठाण्यावर मोर्चे नेतात, मग डिजिटल अटकेची भीती दाखवून भरदिवसा मुंबईसारख्या ठिकाणी हॉटेलमध्ये बोलावून महिलांना नग्न करणाऱ्या सायबर माफियांविरुद्ध राजकीय पुढारी का उठाव करीत नाहीत? निवडणुका आल्या की मतांसाठी राजकीय पुढाऱ्यांना लाडक्या बहिणी आठवतात. तेव्हा जनहो सावधान, आपले संरक्षण आता आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवा.

कुणाही अनोळखी व्यक्तीचा फोन खातरजमा केल्याशिवाय उचलू नका खरे पोलीस, सीबीआय, ईडीचे अधिकारी कधीही व्हिडीओ कॉल करीत नाहीत. ‘डिजिटल अटक’ हा प्रकार भारतात नाहीच कुणीही क्राईम बेंच, पोलीस, सीबीआय, ईडी आदी शाखांचे अधिकारी असल्याचे सांगितले तर तत्काळ फोन ‘कट’ करून टाका. कुणाच्याही बोलण्याच्या मोहात पडू नका. आपल्या मुलाला अटक केली आहे. त्याचा अपघात झाला आहे. आपले एअरपोर्टवर पार्सल अडकले आहे, त्यात ड्रग आहे अशा बतावण्या करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका! चौकशीसाठी आपणास कायदेशीर समन्स पाठवून पोलीस ठाण्यात बोलाविले जाते. तरीही आपण त्या समन्सविषयी खातरजमा करणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवावे. आपली फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 या हेल्पलाइनवर किंवा cybercrime.gov.in वर संपर्क साधावा. मिशन डिजिटल इंडियाचा डंका पिटणारे शासनकर्ते सायबर माफियांचा बंदोबस्त करण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याने आज बँक खातेदारांची, विशेषतः महिलांची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे.

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली व्हिडीओ कॉल करून महिलांना नग्न होण्यास भाग पाडणाऱ्या भामट्यांना फासावर चढविले पाहिजे, इतकी चीड महिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशावेळी लाडक्या भावांच्या धमन्या का तापत नाहीत याचे आश्चर्य वाटते. आपले राज्यकर्ते व विरोधकही याबाबत गंभीर दिसत नाहीत याची जनतेला चीड येत आहे. सध्याच्या डिजिटल युगात माणूस प्रत्येक क्षणी असहाय्य आणि भयभीत बनत चालला आहे. गेल्या वर्षभरात आपल्या देशात 12 हजार कोटी रुपयांची सायबर माफियांनी लूट केली आहे. याला मिशन डिजिटल इंडिया म्हणायचे काय?

[email protected]