पोलीस डायरी – नामुष्की!

>> प्रभाकर पवार

[email protected]

महाराष्ट्र पोलिसांच्या ‘महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या शिफारसीवरून अखेर उचलबांगडी करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त असतानापासून त्यांच्यावर विरोधी पक्षांतर्फे आरोप केले जात आहेत. रश्मी शुक्ला या आरएसएस, भाजपचा ‘अजेंडा’ चालवतात. ‘कार्यकर्त्या’ असल्यासारख्या वागतात. निवडणुकांचे अहवाल भाजपच्या बाजूने तयार करा, विरोधकांचे फोन ‘टॅप’ करा, असेही आदेश आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांना देतात. विरोधी पक्षांच्या या आरोपांची अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली व रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिले. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली. रश्मी शुक्ला या ‘डीजीपी’ पदावरून सोमवारी पायउतार झाल्या. अशी नामुष्की महाराष्ट्रातील कुणाही महासंचालकावर यापूर्वी आली नव्हती.

अरविंद इनामदार हे 1997 ते 2000 या दरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक होते. अत्यंत कडक शिस्तीचे प्रामाणिक आयपीएस अधिकारी अशी राज्य पोलीस दलात त्यांची प्रतिमा होती. रोखठोक स्वभावाच्या विचारांच्या या अधिकाऱ्याने कधी सत्ताधाऱ्यांच्या गैर आदेशांना, शिफारसींना भीक घातली नाही. जे नियमात बसत असेल त्याचेच त्यांनी पालन केले तेव्हा वादग्रस्त असलेल्या एका तत्कालीन मंत्र्याने व त्याच्या पुतण्याने इनामदार यांची तडकाफडकी पुण्यात अडगळीच्या ठिकाणी बदली केली व त्यांच्या जागी ‘डीजीपी’ म्हणून एका भ्रष्ट आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली. या आदेशानंतर अरविंद इनामदार यांनी तत्काळ डीजीपी पदाचा राजीनामा दिला व आपला जाज्वल्य मराठी बाणा त्या मंत्र्याला दाखविला. त्या उलट रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल होऊनही त्यांनी राजीनामा दिला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर एक महिला अधिकारी म्हणून अटकेची कारवाई केली नाही. त्या सहानुभूतीचा शुक्ला यांनी फायदा उठविला. केंद्राच्या मदतीने त्यांनी प्रतिनियुक्तीवर दिल्ली गाठली.

2022 साली महायुती सत्तेवर आल्यावर शुक्ला यांचे भाऊ देवाभाऊ यांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणले व त्यांना ‘डीजीपी’ केले. त्यांच्या निवृत्तीला 6 महिने शिल्लक असताना त्यांना नियमबाह्य अशी 2 वर्षे मुदतवाढही दिली. 2 वर्षे मुदतवाढीची लॉटरी लागल्यानंतर या ताईंच्या स्वभावात, कार्यपद्धतीत काही तरी बदल होईल असे वाटले होते, परंतु तसे काही झाले नाही. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, भाजपच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर (गंभीर घटना असतानाही) गुन्हे दाखल न करणे, त्यांना अभय देणे, निवडणूक काळात पैशाचे वाटप करणाऱ्या सत्ताधारी कार्यकर्त्यांवर कारवाई न करणे सुरूच ठेवले. निवृत्त झाल्यावर आतापर्यंत डीजीपी पदावर असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना कमीत कमी 3 महिने व जास्तीत जास्त 6 महिने मुदतवाढ मिळालेली आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी शुक्ला यांना चक्क 2 वर्षे नियमबाह्य मुदतवाढ देऊन साऱ्या पोलीस दलाला धक्का दिला। सत्तेचा इतका दुरुपयोग कधी झाला नव्हता. पोलीस इतिहासात असे कधी घडले नव्हते. सत्ताधारी सांगतील तशी कामे करणाऱ्या बहुधा या देशातील पहिल्याच ‘आयपीएस अधिकारी असाव्यात.

सूर्यकांत जोग, अरविंद इनामदार, डी. शिवानंदन, संजीव दयाळ, अजित पारसनीस, प्रवीण दीक्षित, दत्तात्रय पडसलगीकर तसेच भारताचे शेरलॉक होम्स म्हणून ओळखले जाणारे रमाकांत कुलकर्णी यांनी डीजीपी पदाची शान व रुबाब राखलाच नाही तर वाढविला होता. परंतु रश्मी शुक्ला यांनी २ वर्षांची मुदतवाढ प्राप्त करून डीजीपी पदाची शान मातीत मिळविली. हे आम्ही नव्हे तर सारे पोलीस दल बोलत आहे.

रश्मी शुक्ला यांची उचलबांगडी झाल्यानंतर जे अधिकारी अजूनही सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून काहीही गैरकाम करण्यास तयार असतात त्यांनी यापासून बोध घेतला पाहिजे. वर्दीची लाज राखली पाहिजे. पोलीस हा जनतेचा आधार आहे. मुंबईसह महाराष्ट्र पोलिसांवर लोकांचा आजही विश्वास आहे. कणा मोडलेले बरेच पोलीस अधिकारी पोलीस दलात आहेत. परंतु कणा ताठ असलेले अधिकारीही कमी नाहीत. ते आहेत म्हणून सामान्यांना आजही सुरक्षित वाटत आहे.

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नारायण मारुतराव कामठे हे प्रमुख (आयजी) होते. 8 वर्षे कामठे यांनी राज्य पोलीस दलाचे निःपक्षपातीपणे नेतृत्व केले. परंतु रश्मी शुक्लांसारख्या ‘आयपीएस’ अधिकारी महिलेने पक्षपाती नेतृत्व करून राज्य पोलीस दलाची शान धुळीला मिळविली कुणाही पोलीस अधिकाऱ्याला राजकीय पक्षाचे काम करायचे असेल तर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन केले पाहिजे. खाकी वर्दीचा दुरुपयोग करता कामा नये. सध्या महाराष्ट्र पोलीस दलात तेच सुरू आहे ‘टेंडर’ भरून क्रीम पोस्टिंग मिळविल्या जात आहेत व राज्यकर्ते त्यांचा हवा तसा वापर करून घेत आहेत. नाही तर रश्मी शुक्लांवर आरोप झाले नसते व त्यांच्यावर पायउतार व्हायची नामुष्कीही आली नसती. रश्मी शुक्ला यांच्या जागी नवे पोलीस महासंचालक म्हणून संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून निःपक्षपाती कारभाराची अपेक्षा सारा महाराष्ट्र करीत आहे. हे संजय कुमार वर्मा यांनीही लक्षात ठेवावे. त्यांना आमच्या शुभेच्छा!