प्रभाकर देशमुख यांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, मंत्री गोरेप्रकरणी कारवाईचा ससेमिरा

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात युटय़ूब चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक झाली आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला, पत्रकार खरात यांच्याशी  माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आज सातारा पोलिसांनी देशमुख यांची कोरेगाव परिसरातील घरी धडक मारली. तसेच तब्बल तीन तास देशमुख यांची चौकशी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते, असे सांगितले होते. त्याअनुषंगानेच सातारा पोलिसांनी देशमुख यांची चौकशी करून कारवाईचा ससेमिरा सुरू केला. दरम्यान, खंडणी  प्रकरणात सातारा पोलिसांनी नुकतेच महिलेला पकडले होते. संबंधित महिलेनेच मंत्री गोरे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते. मात्र, या सर्व प्रकरणात स्थानिक पत्रकार तुषार खरात, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वारंवार संपर्क झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी देशमुखांची चौकशी केली आहे.