शिवसेनेचा वाघ पुन्हा सभागृह गाजवणार, अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी 2 दिवसांनी कमी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी दोन दिवसांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे ते शुक्रवारपासून पुन्हा एकदा सभागृहात दिसतील.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील विधानावरून विधान परिषदेत गोंधळ घालणाऱ्याना रोखणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाविरोधात शिवसेनेचे अनिल परब यांनी उपसभापतींना निवेदन केले.

दरम्यान, यासंदर्भात उपसभापतींच्या दालनात मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा झाली. विरोधी पक्षनेत्यांनीही दिलगिरीचे पत्र दिले आहे. त्यानंतर गुरुवारी अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कारवाईसंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला. दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करावा असा प्रस्ताव त्यांनी मांडला.

यावर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांनीही पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केल्याचे म्हटले. त्यामुळे त्यांच्या निलंबन कालावधी तीन दिवस करत असून ते उद्यापासून सभागृहात दिसतील अशी माहिती दिली.

अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, या निर्णयावर अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की, निलंबन मागे घेण्यास उशीर करण्यात आला. मी दिलगिरी व्यक्त केली होती, त्यानंतर त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवे होते. तीन दिवस यात गेले. उद्यापासून मी सभागृहात दिसेल. अधिवेशनाचे चार-पाच दिवस उरले असून सभागृहात जाऊ दिले नसले तरी मी जनता दरबार सुरू ठेवला होता, असेही ते म्हणाले.