स्वस्त वस्तू देण्याच्या नावाखाली फसवणूक, पवई पोलिसांकडून आरोपीला अटक

स्वस्तात गृहोपयोगी वस्तू देतो असे सांगून पैसे घेऊन पळून जाणाऱ्याला पवई पोलिसांनी अटक केली. राधेश्याम यादव असे आरोपीचे नाव असून त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पवईच्या मोरारजी नगर येथे महिला राहते. गेल्या आठवड्यात त्या पवई जलवायू विहार येथून जात होत्या. तेव्हा त्यांना एकाने रस्त्यात थांबवले. आमच्या मॅडम कधीपासून तुम्हाला बोलावत आहेत, असे सांगत त्याने महिलेशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

मॅडम या रूम शिफ्ट करत आहेत, त्यांच्याकडून फ्रीज, कपाट आणि अन्नधान्य स्वस्तात मिळवून देतो, अशा त्याने भूलथापा मारल्या. मॅडम या दयाळू आहेत, त्या गरीबांना मदत करतात असे त्याने भासवले. तुम्ही 15 हजार रुपये द्या आणि वस्तू घेऊन जा, असे त्याने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्या वस्तू घेण्यास सांगितले.

ठगाने महिलेला स्वस्त वस्तूंबाबत आमिष दाखवले. त्यानंतर महिला घरी गेली. तिने घरातून 11 हजार रुपये घेतले. ते पैसे तिने त्याला दिले. त्यानंतर तो महिलेला घेऊन पवई परिसरात आला. एका इमारतीत त्या मॅडम राहतात, तसेच मॅडमने आपल्याकडे 1 लाख रुपये दिले आहेत, ते बँकेत जमा करून येतो, असे सांगून तो निघून गेला. काही तास महिलेने त्याची वाट पाहिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये राधेश्याम दिसला. अधिक तपासात त्याने फसवणुकीची कबुली दिली.