गरिबी ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी समस्या आहे, असे परखड मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्याला जामीन मंजूर केला. पीडिता अल्पवयीन आहे. आरोपी पीडितेसोबत विवाह करणार आहे. दोघांच्याही कुटुंबीयांची या लग्नाला संमती आहे, असे नमूद करत न्या. संजय मेहरे यांनी आरोपीला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
सामाजिक रचना सांगणारे प्रकरण
या प्रकरणात गरिबीमुळे कुटुंब अल्पवयीन मुलीचे लग्न करण्यास तयार झाले. भारतातील सामाजिक रचनेचे दर्शन घडवणारे हे प्रकरण आहे, असे निरीक्षण न्या. मेहरे यांनी नोंदवले.
काय आहे प्रकरण
पीडिता व आरोपी एकाच कुटुंबातील आहे. या दोघांचा विवाह त्यांच्या कुटुंबीयांनी ठरवला आहे. लग्नाआधीच या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. पीडिता गरोदर राहिली. उपचारासाठी तिला छत्रपत्री संभाजीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. जामिनासाठी आरोपीने न्यायालयाचे दार ठोठावले होते.
पोलिसांचा विरोध
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. तिच्या पालकांनी ना हरकत दिली म्हणून जामीन देता येणार नाही. आरोपीला जामीन मंजूर केल्यास बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा मूळ हेतूच बाधित होईल, असा दावा पोलिसांनी केला. मात्र आरोपी पीडितेसोबत विवाह करणार आहे. तशी त्याने हमी दिली आहे, असे सांगत न्यायालयाने जामीन मंजूर केला.
मुलीच्या भविष्यासाठी लग्नाला संमती
या जामिनाला विरोध नसल्याचे पीडितेच्या वडिलांनी न्यायालयाला सांगितले. मुलगी अल्पवयीन आहे. तरीही तुम्ही विवाहासाठी संमती कशी दिली, अशी विचारणा न्यायालयाने पीडितेच्या वडिलांकडे केली. हृदयविकारामुळे माझ्या पत्नीचे निधन झाले आहे. मुलगी लहान असली तरी तिच्या चांगल्या भविष्यासाठी मी तिचे लग्न ठरवले, असे वडिलांनी न्यायालयाला सांगितले. त्याची न्यायालयाने नोंद करून घेतली.