गरिबी ही देशातील सर्वात मोठी समस्या, हायकोर्टाचे परखड मत

गरिबी ही भारतातील सर्वात मोठी समस्या आहे, असे परखड मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्याला जामीन मंजूर केला. पीडिता अल्पवयीन आहे. आरोपी पीडितेसोबत विवाह करणार आहे. दोघांच्याही कुटुंबीयांची या लग्नाला संमती आहे, असे नमूद करत न्या. संजय मेहरे यांनी आरोपीला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

मुलीच्या भविष्यासाठी लग्नाला संमती

या जामिनाला विरोध नसल्याचे पीडितेच्या वडिलांनी न्यायालयाला सांगितले. मुलगी अल्पवयीन आहे. तरीही तुम्ही विवाहासाठी संमती कशी दिली, अशी विचारणा न्यायालयाने पीडितेच्या वडिलांकडे केली. हृदयविकारामुळे माझ्या पत्नीचे निधन झाले आहे. मुलगी लहान असली तरी तिच्या चांगल्या भविष्यासाठी मी तिचे लग्न ठरवले, असे वडिलांनी न्यायालयाला सांगितले. त्याची न्यायालयाने नोंद करून घेतली.