
आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये बटाट्याचा वापर सर्रास केला जातो. किचनमध्ये बटाट्याचे असंख्य प्रकार बनले जातात. घरातील सदस्य हे सर्व प्रकार चवीने खातातही. याच बटाट्याचा सौंदर्याच्या दृष्टीने खूप उपयोग आहेत हे आपल्याला माहीतही नसते.
बटाट्यापासून केवळ जिभेचे चोचले पुरवता येणार नाहीत, तर बटाटा तुम्हाला सुंदर होण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे. चेहऱ्यावरील पिंपल्स हा तरुणींसाठी डोकेदुखीचा विषय असतो. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा चट्टे उठल्यावर बटाटा हा रामबाण उपाय आहे. बटाटा हा चेहऱ्यासाठी वरदान म्हणून ओळखला जातो. बटाट्यामुळे चेहरा सुंदर होण्यास मदत होते. चेहऱ्याच्या सौंदर्यात बटाटा हा कायम महत्त्वाची भूमिका बजावतो.

बटाट्यामध्ये असलेल्या ब्लिचिंगच्या गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते. तसेच बटाट्यामध्ये स्टार्चची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. या स्टार्चमुळे त्वचेला ओलावा मिळतो त्यामुळे त्वचा मऊ मुलायम राहते. डोळ्याखाली काळी वर्तुळे अधिक प्रमाणात वाढल्यास, कच्चा बटाटा डोळ्यावर ठेवल्यास काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात आपली त्वचा फार मोठ्या प्रमाणावर खराब होते अशावेळी बटाटा हा एक उत्तम उपाय मानला जातो. उन्हाळ्यात चेहरा थंड राहावा म्हणून बटाट्याचा वापर केला जातो. बटाट्याच्या रसामध्ये कच्चे दूध घातल्यास, हे मिश्रण चेहऱ्यावर किमान १५ मिनिटे लावून ठेवावे. यामुळे चेहऱ्यावर चांगली चकाकी येते. हा अगदी साधा सोपा घरगुती फेसपॅक आठवड्यातून तीन वेळा लावल्यास याचे उत्तम परीणाम पाहायला मिळतील.
खासकरुन उन्हाळ्यात बटाट्याचा रस चेहऱ्याला लावणे हे खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला तजेला तर मिळतोच, याबरोबरीने थंडावाही मिळतो. इतर रासायनिक सौंदर्य उत्पादनांपेक्षा बटाटा हा बहुमोलीच नाही तर एकदम खात्रीशीर उपाय म्हणायला हरकत नाही.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)