भाजपचे सरकार येताच अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा जोरदारपणे लोकांच्या गळी उतरवायला सुरुवात केली आहे. बहुभाषिक धारावीत गुजरातीमधून जोरदार फलकबाजी करून डीआरपीपीएल कंपनीने भविष्यात धारावीचा कसा आणि कशासाठी पुनर्विकास केला जाणार आहे, हे दाखवून दिले. धारावीत होत असलेल्या गुजरातीमधील फलकबाजीमुळे अदानीने पुन्हा धारावीत हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाच्या माध्यमातून केला जाणार आहे. मात्र, धारावीकरांचा अदानीकडून केल्या जाणाऱ्या पुनर्विकासाला कडाडून विरोध आहे. त्याविरोधात धारावीकरांकडून वेळोवेळी मोर्चा आणि स्वाक्षऱ्या मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. मात्र, आता भाजप सरकार सत्तेत येताच धारावी पुनर्विकासाचा मुद्दा लोकांच्या गळी उतरवण्यासाठी धारावीत गुजरातीसह अन्य भाषांमध्ये फलकबाजी करण्यात येत आहे.
फलकबाजीची गरज का?
धारावीचा पुनर्विकास योग्य मार्गाने करायचा असेल तर तो धारावीकरांना न दुखावता, त्यांचा आहे त्याच ठिकाणी पुनर्विकास करून केला पाहिजे, हे धारावीकरांबरोबर मुंबईकरांचेही म्हणणे आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार धारावीकरांच्या मनाविरोधात जाऊन प्रकल्प उभारत आहेत. त्यामुळेच सरकारला फलकबाजीची गरज भासली, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र गुजराती भाषेतील फलकांचीच चर्चा सध्या धारावीत सुरू आहे. इतक्या मोठय़ा संख्येने फलकबाजीची गरज काय, असा प्रश्न यानिमित्ताने धारावीकरांनी उपस्थित केला आहे.
धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) बहुभाषिक धारावीत जोरदार फलकबाजी सुरू केली आहे. संपूर्ण धारावीत मराठी, हिंदी, तामीळ, तेलगू भाषेत पुनर्विकासासंबंधीची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, यात गुजराती भाषेतील फलकांची संख्याच जास्त असल्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. डीआरपीपीएल प्रकल्प मार्गी लावणारी कंपनी आहे की, पीआरगिरी करणारी कंपनी असा प्रश्न आता धारावीकर विचारत आहेत.
काय लिहिले आहे फलकांवर
धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून रहिवाशांनी अदानीच्या पुनर्विकासाला विरोध केला असून मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विरोध कायम राहील, असा इशारा दिला आहे. मात्र, लोकांच्या विरोधाला न जुमानता राज्य आणि केंद्र सरकार हा प्रकल्प रेटून नेत आहेत. त्यामुळेच धारावी पुनर्विकासाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने डीआरपी (धारावी पुनर्विकास प्रकल्प) आणि एसआरएची (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) रचना केली आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकासाची अंमलबजावणी सहज होईल, अशा आशयाचे फलक मोठय़ा संख्येने धारावीत लावण्यात आले आहेत.