मिंधे गटाने टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर्स दाखवून छुपा प्रचार सुरू केला आहे. हा आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने आज केली. ही घटना गंभीर असून निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय झाल्याने तत्काळ कारवाई करू, असे आश्वासन मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी दिले. यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी निवडणूक अधिकाऱयांची भेट घेऊन तक्रार केली. याबद्दल अधिक माहिती देताना सावंत म्हणाले, ‘स्टार प्रवाह’वरील मालिका कटेंटमध्ये शिंदे गटाची जाहिरात करणारी पोस्टर्स दाखवण्यात येत आहेत. एका दृश्यातून दुसऱया दृश्यात जाताना मध्येच असे पोस्टर्स दाखवले जात आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत 13 आणि 14 नोव्हेंबर रोजीच्या भागांत असे जाहिरात पोस्टर्स दाखवले. याच वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ व इतर मालिकांमध्येही छुपी जाहिरातबाजी केली जातेय. या पोस्टरबाजीबद्दल शिंदे गटाकडून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीला अधिकृत रक्कम दिली आहे का आणि नसेल तर काळ्या पैशांचा व्यवहार आहे का? असे सावंत म्हणाले.