पोस्ट खात्याने दिली गुड न्यूज, केवायसीसाठी आता पोस्टात जायची गरज नाही

अनेकांचे पोस्टात बचत खाते असते. त्यासाठी दर तीन वर्षांनी केवायसी अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते आणि संबंधित कागदपत्रे द्यावी लागतात. मात्र यातून लवकरच सुटका होणार आहे. कारण आता खातेधारकांना केवायसी करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया घरी बसून ऑनलाइन पूर्ण करता येईल.

याची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. याचा फायदा कर्नाटकातील 1 कोटी 90 लाख पोस्टल खातेधारकांना होईल. कर्नाटकचे मुख्य पोस्टमास्टर जनरल राजेंद्र एस कुमार म्हणाले की, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवायसीसंबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी पोस्ट

ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. हे घरबसल्या ऑनलाइन आधार प्रमाणीकरणाद्वारे केले जाईल. पोस्टाच्या मोबाइल अॅपमध्ये केवायसी आणि बायोमेट्रिक फिंगर प्रिंटची प्रक्रिया समाविष्ट केली जाणार आहे.

वेबसाइटवर कागदपत्रे करा अपलोड  

मोबाइल अॅपवर फिंगर प्रिंट व्हेरिफिकेशन करण्यापूर्वी खातेधारकांना पोस्टाच्या वेबसाइटवर indiapost.gov.in  वर ई-बँकिंग पर्यायावर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तिथे केवायसीसंबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. टपाल विभाग आधार प्रमाणीकरणाद्वारे तुमच्या ओळखीची पुष्टी करेल. यानंतर तुम्ही खात्यांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करू शकता. लवकरच ही सुविधा इतर राज्यांतही मिळणार असल्याचे समजते.