राज्यात परतीच्या पावसाने मुसळधार बरसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बुधवारी सकाळी 06.00 वाजण्यास सुमारास मांजरा प्रकल्प 95.02 टक्के क्षमतेने भरला आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात होणारी पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाच्या सांडव्याद्वारे मांजरा नदी पात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये. तसेच कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे.