ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणारी पाच कसोटी सामन्यांची मालिका हिंदुस्थानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भवितव्य तर ठरविणारच आहे, पण त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दिग्गजांच्या कारकीर्दीचाही पैसला करणार आहे. या मालिकेच्या यशापयशावर या चौघांचेही भवितव्य अवलंबून असेल. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानला या मालिकेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही तर रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करू शकतात, असे भाकित क्रिकेटपंडितांनी आत्तापासून वर्तवायला सुरुवात केलीय.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेने हिंदुस्थानी संघाला फारच अडचणीत आणले आहे. हिंदुस्थानचा 0-3 हा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला असून यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे अपयश प्रकर्षाने जाणवले आहे. या वर्षी जून महिन्यात वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित-कोहली-जाडेजाने टी-20 क्रिकेटमधून सन्मानेने निवृत्त घेतली होती, पण मायदेशात झालेल्या या पराभवामुळे त्यांच्या कसोटी कारकीर्दीबाबतही प्रथमच निवृत्तीबाबत चर्चेला उधाण आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील मालिका या सर्वच दिग्गजांसाठी निर्वाणीची मालिका ठरू शकते. रोहित आणि विराटची न्यूझीलंडविरुद्धची देहबोली पाहाता ते फार काळ कसोटी क्रिकेट खेळतील, याबाबतही साशंकता निर्माण झालीय.
भविष्यात होणारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि आयसीसी वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानच्या नव्या संघ बांधणीबाबत प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती लवकरच काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. हे निर्णय पूर्णतः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशापयशावर अवलंबून असतील. त्यामुळे शर्मा आणि कोहली हे दोघेही आपल्या ऑस्ट्रेलियातील शेवटच्या मालिकेला संस्मरणीय करण्यासाठी जिवाचे रान करतील, असा विश्वास आहे.